पुणे : भारतात कुस्तीला सरकार दफ्तरी फारसे महत्व नसले, तरी परदेशात कुस्तीला राजाश्रय आणि लोकाश्रय केव्हाच मिळाला आहे. कुस्तीने कधीच सरकार दफ्तराचा विचार केला नाही. पुण्यातच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रेक्षकांच्या लाभलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे हे पुन्हा एकवार सिद्ध झाले. नुसते सिद्ध झाले नाही, तर लढती पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या जॉर्जियन कुस्ती प्रशिक्षक मराद जोईझे यांनीही आश्चर्याने तोंडात बोट घातले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढती पाहण्यासाठी जोईझे उपस्थित होते. सातत्याने भ्रमणध्वनीवरून आपल्या सहकाऱ्याशी संवाद साधताना एक व्यक्ती लढती समोरच्या व्यक्तीस हात दाखवत होती. मध्येच हातवारे करून त्याच्याशी चर्चा करत होती. त्या व्यक्तीच्या देहयष्टिवरून तो कुस्तीगीर असावा हे लगेच कळत होते. त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ती व्यक्ती जॉर्जियातील आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक मराद जोईझे असल्याचे समजले. जोईझे गेली पाच वर्षे पुण्यातच हिंदकेसरी योगेश दोडके कुस्ती संकुलात मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रात कमालीची गुणवत्ता आहे, यात शंकाच नाही. त्या गुणवत्तेला नेमकी उर्जा कुठून मिळते हे मला आज समजले, असे जोईझे यांनी सांगितले.

हेही वाचा – पुण्यात जी-२० परिषदेला उद्यापासून सुरुवात

केसरी कुस्ती स्पर्धेला झालेल्या गर्दीने ते भारावून गेले होते. जोईझे म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती बघायला गर्दी होते, स्टेडियमचा काही भाग प्रेक्षकांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेत असतो. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग कधीच बघितला नाही. कुस्तीचा इतका मोठा चाहतावर्ग बघितल्यावर भारतातील कुस्तीच्या लोकप्रियतेची कल्पना येते.’

जोईझे ३५ वर्षीय असून त्यांना प्रशिक्षणाचा १५ वर्षांचा अनुभव आहे. त्यापूर्वी त्यांची दहा वर्षांची कुस्तीची कारकीर्द आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे कुस्तीगिराला घरातूनच वारसा मिळतो, तसाच वारसा जोईझे यांनाही मिळाला आहे. त्यांचा मोठा भाऊ जागतिक पदक विजेता आहे. मराद स्वतः युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेतील अनेक पदकविजेते आहेत. भारतीय कुस्ती संदर्भात विचारले असता, जोईझे यांनी आगामी पाच वर्षांत भारत कुस्ती विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला. एक काळ असा होता की, भारतीय मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना डगमगत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती खूप बदलली आहे. भारताने झपाट्याने खेळात प्रगती केली आहे. बजरंग पुनियाच्या यशाने हे दाखवून दिले आहे. भारतीय महिलाही या खेळात प्रगती करत असल्याचे जोईझे यांनी सांगितले.

हेही वाचा – राज्यात हुडहुडी आणखी वाढणार, उत्तरेकडे थंडीची लाट, राजस्थानात उणे तापमान

भारतीय कुस्तीला स्वतः परंपरा असली, तरी त्यांना परदेशी प्रशिक्षकाची मदत का घ्यावी लागते असे विचारले असता, जोईझे म्हणाले, ‘बदलत्या काळात कुस्तीने आक्रमकता कायम ठेवली असली, तरी अधिक वेगवान झाली आहे. खेळाच्या काही नव्या कल्पना, तंत्र समोर आले आहेत. या अभ्यासात भारतीय मागे राहतात. त्यामुळे, भारतीय कुस्तीपटूंसाठी परदेशी प्रशिक्षकाची मदत घ्यावी लागते.’ अर्थात, भारतात चांगले प्रशिक्षक नाहीत, असे नाही. केवळ अधुनिक तंत्राचा अभाव हाच त्यांच्या आणि परदेशातील प्रशिक्षकांमधील महत्वाचा फरक आहे. भारतीय प्रशिक्षकांमध्ये दर्जा नसता तर अशी मैदाने गाजवणारे मल्ल तयार झालेच नसते, असेही त्यांनी सांगितले.

पुण्यातही खेळाडूंमध्ये शिकण्याची तयारी चांगली आहे. संकुलात साधारण वीस ते पंचवीस मुले प्रशिक्षणासाठी येतात. ही सर्व जवळील परिसरातील शाळेत जाणारीच मुले आहेत. त्यांना त्यापेक्षा मुलांच्या पालकांना आपल्या पाल्याने क्रिकेट, टेनिस, फूटबॉल सोडून कुस्तीत कारकीर्द घडवावी, असे वाटणे खूप महत्वाचे असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. साधारण दहा ते पंधरा वयोगटातील ही मुले असून, पाया भक्कम करण्याचे हेच वय आहे. मी परदेशी आहे म्हणून आमच्या प्रशिक्षणात अडथळा येत नाही. एकदा का गुरू शिष्याचे नाते निर्माण झाले की, त्यामध्ये कसलाच अडथळा येत नाही, अगदी भाषेचाही नाही, असेही जोईझे यांनी आवर्जुन सांगितले.

हेही वाचा – पुणे : संक्रातीला चोरट्यांचा धुमाकूळ, महिलेचे सव्वातीन लाखांचे दागिने हिसकावले

म्हणूनच त्यांची नियुक्ती…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलत्या काळाचा विचार करून आम्ही संकुलात परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. परदेशी प्रशिक्षकाच्या नियुक्तीचा हा पहिलाच वैयक्तिक प्रयोग आहे. त्याचा सर्व खर्च स्वतः उचलत आहे. १० ते १५ वयोगटातील मुले आमच्याकडे प्रशिक्षणासाठी येतात. मुले अजून लहान आहेत. त्यांच्यातील कौशल्याला येथे पैलू पडत आहेत. परिपूर्ण कुस्तीगीर घडण्यासाठी वेळ लागेल. पण, भविष्यात नक्कीच चांगले कुस्तीगीर घडतील, असे हिंद केसरी योगेश दोडके यांनी सांगितले.