अंतराळ संशोधनसाठी प्रसिद्ध असलेल्या व पुणे विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या ‘आयुका’ या संस्थेची राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि पुणे पोलिसांनी मंगळवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत तपासणी केली, त्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणांनी आयुकाचा पूर्णपणे ताबा घेतला होता. या वेळी पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकालाही बाहेर ठेवण्यात आले. पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, ही दक्षता म्हणून केलेली रंगीत तालीम (मॉक ड्रिल) असल्याचे सांगितले.
आयुका संस्थेत मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून तपासणी सुरूवात झाली. याबाबत नियंत्रण कक्षालाही कळविण्यात आले. बॉम्ब शोधक व नाशक पथकालाही बोलविण्यात आले. मात्र, रात्री दहा वाजेपर्यंत त्यांना आत प्रवेश देण्यात आलेला नव्हता. आयुकामधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही तपासणी सुरू असल्याचे सांगितले.