पुणे: आगामी काळात विमाधारकाच्या जीवनशैलीशी निगडित सवयींच्या आधारे आरोग्य व मोटार विमा हप्त्याची आपोआप आकारणी व्हायला हवी. निरोगी जीवनशैली असलेल्या व्यक्तीला कमी हप्ता आणि ती नसलेल्या व्यक्तीला जास्त हप्ता असावा, अशी भूमिका भारतीय विमा नियामक प्राधिकरणाचे सदस्य सत्यजित त्रिपाठी यांनी मंगळवारी मांडली.
राष्ट्रीय विमा अकादमीच्या (एनआयए) वतीने आयोजित २१ व्या विमा परिषदेत त्रिपाठी बोलत होते. ते म्हणाले की, आरोग्य आणि मोटार विम्यांमध्ये बदल आवश्यक आहेत. आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट उपकरणे आहेत. त्यातून तुमच्या जीवनशैलीची माहिती मिळते. या आधारे मूल्यमापन करणे शक्य आहे. विमाधारकाने जास्त चालणे, पुरेशी झोप, तंदुरुस्तीचे उद्दिष्ट गाठणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे या गोष्टी केल्यास त्याला आरोग्य विम्याचा हप्ता कमी द्यावा लागेल. रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती कोणत्याही बाह्य घटकामुळे उद्धवू शकते. मात्र, जीवनशैलीच्या आधारे आधीच मूल्यमापन करून जोखीम आधीच पडताळून पाहता येईल. त्यानुसार विमाधारकाचा हप्ता कमी करता येईल.
एखाद्या चालकाच्या वर्तनाच्या आधारे विमा हप्ता ठरविण्यात यावा. त्यासाठी हा चालक वाहन चालवत असतानाच्या प्रत्यक्ष माहितीच्या आधारे हे मूल्यमापन होईल. त्यात चालक कशाप्रकारे ब्रेक दाबतो, वेग किती ठेवतो, वाहन सुसुाट चालवितो का यावर विम्याचा हप्ता ठरवायला हवा. याचा सकारात्मक परिणाम पुढे चालकाच्या वर्तनावरही दिसून येणार आहे. चालकाने योग्य प्रकारे वाहन चालविल्यास त्याला त्याचा फायदा विम्याच्या कमी हप्त्याच्या रुपाने मिळेल. यातून वाहतुकीची शिस्त आणि नियम पाळण्याचे प्रमाण वाढेल, असे त्रिपाठी यांनी नमूद केले.
याप्रसंगी राष्ट्रीय विमा अकादमीचे संचालक बी.सी. पटनाईक म्हणाले की, या परिषदेमुळे उद्योग, धोरणकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र येऊन विमा क्षेत्रातील बदल आणि नवकल्पनांवर चर्चा करण्याची उत्तम संधी मिळाली. आज मांडलेल्या विचारांनी सोपी, सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह विमा व्यवस्था तयार करण्याच्या उद्दिष्टाला आणखी मजबूत आधार मिळाला आहे.
या परिषदेला राष्ट्रीय आयुर्विमा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर पटनाईक, मार्श मॅकलेनन इंडियाचे मुख्याधिकारी संजय केडिया, द न्यू इंडिया अॅशुरन्सच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका गिरीजा सुब्रह्मण्यम, राष्ट्रीय विमा अकादमीचे संचालक बी.सी.पटनाईक आदी उपस्थित होते.
