लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता पहिलीपासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुचवल्यानुसार दैनिक, साप्ताहिक, वार्षिक वेळापत्रकानुसार, इयत्तानिहाय, विषयनिहाय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या, कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमासह शाळांचे वार्षिक वेळापत्रकही बदलण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार तीन ते आठ वर्षांच्या मुलांसाठीच्या पायाभूत स्तरामध्ये बालवाटिका १, २, ३, पहिली आणि दुसरी या वर्गांचा समावेश असेल. आठ ते अकरा वर्षांच्या मुलांसाठीच्या पूर्वतयारी स्तरामध्ये तिसरी, चौथी आणि पाचवी या वर्गांचा, ११ ते १४ वयाच्या मुलांसाठीच्या पूर्वमाध्यमिक स्तरामध्ये सहावी, सातवी, आठवी या वर्गांचा, तर १४ ते १८ वर्षांच्या मुलांसाठीच्या माध्यमिक स्तरामध्ये नववी, दहावी, अकरावी, बारावी या वर्गांचा समावेश असणार आहे.
राज्यातील शाळांच्या सत्र निश्चितीचा कालावधी प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालकांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या (एससीईआरटी) सल्ल्याने निश्चित करावा. द्वितीय सत्राचे संकलित मूल्यमापन, वार्षिक परीक्षा या सत्रअखेरच घ्याव्यात, त्याचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालकांनी राज्य एससीईआरटीचे संचालक यांच्या सल्ल्याने प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाठ्यपुस्तके व पाठ्यसाहित्य
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असणे, आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचार वाढविण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे, अनुभवात्मक शिक्षण अशा बाबींचा समावेश अभ्यासक्रमात असणे आवश्यक आहे. बालभारतीची पाठ्यपुस्तके निर्मितीमध्ये वेळोवेळी एससीईआरटीचे संबंधित विभाग प्रमुख, विषय तज्ज्ञ यांचा सहभाग असावा. पाठ्यपुस्तके ही निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तीची पूर्तता करणारी, अंमलबजावणी योग्य असल्याची पडताळणी एससीईआरटीने करून पाठ्यपुस्तकांना शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी. या मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करता येईल. अंमलबजावणी वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके आवश्यक सर्व माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बालभारतीची राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी
राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार केलेल्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी चार वर्षांत टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीला नवा अभ्यासक्रम लागू होईल. २०२६-२७ मध्ये दुसरी, तिसरी, चौथी, सहावी या वर्गांना, २०२७-२८ मध्ये पाचवी, सातवी, नववी, अकरावी या वर्गांना, तर २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावी या वर्गांना नवा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर शाळांच्या प्रचलित वार्षिक वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो. मात्र, त्याबाबत अद्याप नेमकी स्पष्टता नाही. -महेंद्र गणपुले, माजी मुख्याध्यापक