पुणे : अरबस्तानच्या बाहेर आलेला इस्लाम आणि रोमच्या बाहेर आलेला ख्रिश्चन धर्म आध्यात्मिक कमी आणि राजकीय अधिक होता. भारतावर झालेले अरबी आक्रमण हे राक्षसी आणि रानटी होते. इस्लामचे सर्वभक्ष्यी स्वरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. मंदिरे तोडण्यामागे उद्दामपणा होता. इस्लामी राजवटीला पहिला यशस्वी विरोध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी केले.

श्रीशैलम (आंध्रप्रदेश) येथील श्री शिवाजी मेमोरियल कमिटी आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्यावतीने डॅा. केदार फाळके लिखित ‘शिवछत्रपतींचा वारसा- स्वराज्य ते साम्राज्य १६००-१८१८’ या पुस्तकाचे प्रकाशन मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, कमिटीचे सचिव जी. रघुरामय्या, उपाध्यक्ष उदय खर्डेकर आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात ‘दि लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी-किंगडम टू एम्पायर १६००-१८१८’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशनही भागवत यांच्या हस्ते झाले.

भागवत म्हणाले की,  इस्लामी आक्रमणाच्या विरोधात कसे प्रयत्न करायला हवेत याचा विचार अनेक वर्षं सुरू होता. त्या प्रयत्नांमधे राहिलेल्या त्रुटींचा अभ्यास करून इस्लामी राजवटीला पहिला यशस्वी विरोध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. हा भारत टिकणार की नाही याचे उत्तर शिवाजी महाराजांच्या रीतीने मिळाले. शिवाजी महाराजांनी संघटित केलेल्या शक्तीमुळे महाराष्ट्र टिकला.  शिवाजी महाराजांचा आदर्श हा त्रिकालाबाधित होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाजी महाराजांनी दिलेली ध्येयनिष्ठता अटकेपार झेंडे फडकवेपर्यंत होती. त्यानंतर स्वतःचा स्वार्थ बघितला जाऊ लागला . पानिपतच्या तिसऱ्या युद्धात प्रतिपक्ष इस्लामी राज्य म्हणून लढला तसे मराठ्यांचे सैन्य हिंदू म्हणून लढले नाही. आजही तीच लढाई आहे. असुरांशी लढाई आहे आणि त्याची केंद्रही भारतच आहे  पुन्हा विजिगिशू वृत्ती स्विकारायला हवी. शिवाजी महाराजांची भारताला ही विजिगीशू वृत्ती पुढे न्यायची आहे. शिवाजी महाराजांच्या या कौशल्याचा युद्धशास्त्राच्या, समाजशास्त्राच्या आणि प्रशासन अंगाच्या दृष्टीने अभ्यास होऊ शकतो, असेही भागवत यांनी सांगितले. रावत आणि फाळके यांनी मनोगत व्यक्त केले. खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. सुधीर थोरात यांनी आभार मानले. मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन केले.