पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या श्री पूना गुजराती बंधू समाजच्या ‘जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर’च्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी भाषण संपवताना ‘जय हिंद’, ‘जय महाराष्ट्र’ यानंतर ‘जय गुजरात’ असे म्हटल्याने विरोधकांनी शिंदे यांना लक्ष्य केले.
मुंबईमध्ये आज (५ जुलै) शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्रितपणे होणाऱ्या विजयी मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचे काय पडसाद उमटणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्याच्या प्रयत्नांमुळे विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवले होते. सरकारने याबाबतचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज, शनिवारी उद्धव आणि राज ठाकरे यांचा विजय मेळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते एका कार्यक्रमात श्री पुणे गुजराती बंधू समाज यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेंशन सेंटरचे उद्घाटन तसेच पीएचआरसी हेल्थ सिटीचे भूमिपूजन झाले. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण संपताना ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ असे म्हटल्याने त्यावरून चर्चा सुरू झाली.
दरम्यान, शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रात सत्ताधारी असलेले भाजप सरकार आणि शहा यांच्या कामाचे शेरो-शायरी करत कौतुक केले. ‘शहा यांच्या कुशल रणनीतीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील भारताची दखल गांभीर्याने घेतली जात आहे. महाराष्ट्राच्या विकासात गुजराती समाजाचे मोठे योगदान असून, महाराष्ट्राच्या संस्कृतीत गुजराती समाज समरस आणि एकरूप होऊन गेला आहे.’ असे शिंदे म्हणाले.
महाराष्ट्राच्या प्रगतीत गुजराती समाजाचे योगदान : अजित पवार
‘गुजराती समाजामुळे महाराष्ट्राची तिजोरी सशक्त होत आहे. गुजराती समाज हा व्यापाराच्या माध्यमातून केवळ पैसा कमवत नाही, तर आपल्या समाजाचे ऋण लक्षात घेऊन सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. करोनाच्या काळात या समाजाने भरभरून केलेली मदत आणि दान यामुळे या समस्येचा सामना करू शकलो. महाराष्ट्राच्या प्रगतीत गुजराती समाजाने सर्वार्थाने योगदान दिले आहे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले.