पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून बैठका, मेळावे घेतले जात आहेत. त्या दरम्यान अनेक पक्षांमध्ये नेते, कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश होताना दिसत आहे.

त्या सर्व घडामोडीदरम्यान पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कामठे आणि शरद पवार गटाचे नेते, जिल्हा भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर, काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे पाटील, शरद पवार गटाच्या नेत्या स्वाती चिटणीस यांसह अनेक नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश झाला. या पक्ष प्रवेशामुळे अजित पवार यांनी भाजपा आणि शरद पवार गटाला धक्का देण्याचे काम केले आहे.

या पक्ष प्रवेशावेळी अजित पवार म्हणाले, मागील तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही, पण येत्या काळात कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा, प्रत्येक नागरिकाशी चांगल्या प्रकारे संवाद साधा, आज ज्यांचा प्रवेश झाला आहे,

त्या सर्वांनी जोमाने काम करा आणि येत्या काळात आणखी प्रवेश होणार आहेत. त्यामुळे आता माझं कसं होणार ही भावना कोणत्याही कार्यकर्त्यांनी मनात आणू नका, काम करत रहा, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.