जेजुरी : कडेपठारच्या डोंगरदरीतील मध्यरात्रीची वेळ ,हवेतील गारवा, अंधारात आकाशाकडे मुक्तपणे झेपावणाऱ्या आधुनिक पद्धतीच्या विविध रंगाच्या हवाई तोफा, फटाक्यांचा आवाज, भुईनाळ्यांचा उजेड, श्री खंडोबा देवांचा पालखी भेटीचा सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आलेले हजारो भाविक, मोठ्या उत्साहाने ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष आणि पावसाने घेतलेली विश्रांती अशा भारलेल्या वातावरणात रात्री अडीच वाजता दरीमध्ये असलेल्या रमण्यातील खंडोबाची पालखी व कडेपठारच्या डोंगरावर असलेली पालखी यांची भेटाभेट झाली.
जेजुरीच्या मर्दानी दसऱ्यातील महत्त्वाचा हा सोहळा अनुभवायला मिळाला याचा आनंद सर्वच भक्तांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला मर्दानी दसरा सोहळ्याची खंडा उचलणे स्पर्धा झाल्यावर तब्बल १९ तासांनी सांगता झाली.
दसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता खंडोबा गडावर मुख्य पेशवे इनामदार यांनी सूचना केल्यानंतर घडशी समाजातील कलावंतांनी पारंपरिक वाद्य वाजवून शेडा दिला. यानंतर पालखी खांदेकरी-मानकरी यांनी उचलून खांद्यावर घेतली. पालखीत खंडोबा म्हाळसादेवींची मूर्ती ठेवून पालखी वाजत गाजत सिमोलंघनासाठी निघाली. श्रीमार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त अभिजीत देवकाते, ॲड पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे,ॲड विश्वास पानसे, अनिल सौंदडे, डॉ. राजेंद्र खेडेकर, तहसीलदार विक्रम रजपूत, व्यवस्थापक आशिष बाठे यांच्यासह हजारो ग्रामस्थ यावेळी गडावर उपस्थित होते.
‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा घोष करीत पालखीवर भंडार खोबरे आणि सोन्याची (आपट्यांची पाने) मुक्त उधळण केली. यानंतर पालखी गडाला वळसा मारून दरीमध्ये असलेल्या रमणा या ठिकाणी रात्री एक वाजता नेऊन ठेवण्यात आली.
कडेपठारच्या डोंगरावर श्रीखंडोबाचे मूळ ठिकाण आहे. येथून खंडोबा म्हाळसादेवीची मूर्ती घेऊन येथून पालखी सोहळा रात्री नऊ वाजता भेटा भेट सोहळ्यासाठी निघाला. सनई, ढोल, शंख,डमरू,संबळ,ढोल,ताशा आदी पारंपरिक वाद्य वाजवीत, हवाई नळे, पेटविलेल्या दिवट्यांचा उजेड, फटाक्यांची आतषबाजी करीत पालखी डोंगरातील अवघड वळणे,चढ उतार ,उंचवटे पार करीत पुढे सरकत होती. मानकरी सुभाष राऊत यांच्या परिवाराने तयार केलेले हवाई नळे, दिवट्या पेटवून उजेड केला जात होता. डोंगर वाटेतील सुसूरटिंगी ही अवघड टेकडी मानली जाते. ही टेकडी पार करताना करताना पालखीच्या खांदेकाऱ्यांचे कसब पणाला लागले. या ठिकाणी हातांची साखळी करून पालखीला वर ओढून घ्यावे लागले. अत्यंत खडतर व कठीण असा प्रवास करून पालखी भेटा भेट सोहळ्याच्या ठिकाणी रात्री दोन वाजता पोहोचली येथून हजारो भाविक डोंगरातूनच खाली दरीमध्ये उतरले.
दोन्ही पालख्यांच्या मूर्तीच्या मागे आरसा धरला जातो आणि दोन्ही आरशांमध्ये एकमेकांचे मुखदर्शन झाल्यानंतर भेट झाल्याचे मानले जाते. दोन्ही पालख्यातील अंतर खूप असते. येथे हवाई नळे, भुईमुळे उडवून उजेड केला जातो. या उजेडात अडीच वाजता दर्शन झाल्याचे मानकरी राऊत परिवार यांनी जाहीर केले.
कडेपठारच्या डोंगरात आणि दरीतील रमणा या ठिकाणी श्री खंडोबा देवस्थान कडेपठार देवस्थान यांनी येणाऱ्या ग्रामस्थांना भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, नाश्ता, भोजन आदी सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या.
वाटेत आपट्याच्या झाडाचे पूजन केल्यावर गडाच्या पायथ्याशी सकाळी साडेसहा वाजता पालखी आली. रात्रभर जेजुरी नगरी जागीच होती. सकाळी साडेसात वाजता पालखीने पुन्हा खंडोबा गडामध्ये प्रवेश केला. खंडोबा मंदिराला वळसा मारून पालखी नाचवत भंडार घरामध्ये नेण्यात आली. तेथे रोज मोरा (ज्वारी धान्य) वाटप करण्यात आले.
यंदा सुंबरान नाही
दरवर्षी दसऱ्याला जेजुरीत मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित असतात. मात्र, यंदा मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना, संभाजीनगर, विदर्भ आणि सोलापूर भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने जीवित हानी झाली. त्यामुळे या परिसरातील धनगर बांधव आले नाहीत. पहाटे पालखी पुन्हा गडावर जाताना गडाच्या पायथ्याशी मोठ्या आनंदाने धनगर बांधव सुंबरान मांडतात. धनगरी ओव्या-गाणी म्हणतात. मात्र, यंदा गडाच्या पायथ्याशी ढोल वाजले नाहीत.
खंडा उचलणे स्पर्धेत रमेश शेरे प्रथम
खंडोबा गडामध्ये पेशवाईच्या काळातील सोनोरीचे सरदार पानसे यांनी देवाला अर्पण केलेला एक मण वजनाचा शुद्ध पोलादी खंडा (तलवार) आहे. हा खंडा एका हातात उचलून धरण्याची आणि विविध कसरती करण्याची स्पर्धा या ठिकाणी घेतली जाते. आज सकाळी आठ वाजता या खंड्याची पूजा पुजारी विलास बारभाई व सरदार पानसे यांचे वंशज यांनी केल्यानंतर खंडा उचलणे स्पर्धेला सुरुवात झाली. त्यामध्ये ४० जणांनी सहभाग घेतला.
एका हातात खंडा उचलून धरणे या स्पर्धेत रमेश शेरे यांनी तब्बल तेरा मिनिटे २८ सेकंद खंडा उचलून प्रथम क्रमांक मिळविला. अंकुश गोडसे यांनी तेरा मिनिटे २६ सेकंद खंडा उचलून द्वितीय क्रमांक पटकावला. हेमंत माने यांना तृतीय क्रमांक मिळविला. मंगेश चव्हाण, सुहास खोमणे, गिरीश घाडगे यांना सन्मानचिन्ह आणि प्रतीक खोमणे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.
खंडा कसरत स्पर्धेत नितीन कुदळे, अक्षय गोडसे, शिवाजी राणे, शिवम कुदळे, सचिन कुदळे यांना सन्मानचिन्ह, तर विशाल माने आणि स्वप्नील शिंदे यांना उ त्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला.