पुणे : गुरुवार पेठेतील सराफी पेढीतून चांदीचे दागिने, तसेच वस्तू असा ऐवज लांबवून पसार झालेल्या चोरट्याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४८ लाख ४५ हजार रुपये किमतीचे तब्बल ३६ किलो ४४२ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
राजेश महाराणीदीन सरोज (वय ३६, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुरुवार पेठेतील फुलवाला चौकात असलेल्या सराफी पेढीचा दरवाजा उचकटून १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी ७० किलो चांदीचे दागिने चोरून नेले होते. चोरट्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपले होते.
पोत्यात चांदीचे दागिने भरून चोरटे चालत फुलवाला चौकातून गेल्याचे चित्रीकरणात दिसून आले. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली होती.
आरोपी सरोज हा उत्तर प्रदेशात पसार झाल्याची माहिती तपासात मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सराेजला उत्तर प्रदेशातून अटक केली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस कर्मचारी कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, विश्वजित गोरे, हर्षल दुडम आणि पथकाने ही कामगिरी केली. सराेज आणि साथीदार पुणे आणि मुंबईत कामाच्या शोधात आले होते.