पुणे : बाजीराव रस्त्यावरील सराफी पेढीतून चोरट्याने एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा चार लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एका सराफी पेढीच्या मालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेजवळ सराफी पेढी आहे. दैनंदिन वापरातील एक ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची विक्री ग्राहकांना केली जाते. सराफी पेढीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या प्रसाधनगृहाची खिडकी उचकटून चोरटा आत शिरला. चोरट्याने गल्ल्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा ऐवज लांबविला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.