पुणे : कोंढवा बुद्रुक आणि महंमदवाडी भागात झालेल्या घरफोडीच्या तीन घटनांमध्ये बारा लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. कोंढवा बुद्रुक भागातील टिळेकर नगर परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून पाच लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना मंगळवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे घडली. याप्रकरणी संतोष नागेंद्र पतंगे (वय ४२, रा. टिळेकर नगर, कोंढवा बुद्रुक) यांनी तक्रार दिली असून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या घराच्या पार्किंगमधील खोलीचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील सेफ्टी लॉकर तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण पाच लाख ८६ हजाराचा ऐवज चोरला.
महंमदवाडी परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे दोन लाख ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मोनिका कौस्तुभ जाधव (वय ३७, रा. हेवन पार्क, महंमदवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे दरवाजे आणि लॉकर कशाच्यातरी सहाय्याने उघडून चोरट्याने दागिने चोरले.
कोंढवा खुर्द परिसरातील साईबाबानगर येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना मंगळवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी घडली. पुष्पा जनार्धन खैरे (वय ६०, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप चोरट्याने कशाच्यातरी सहाय्याने उचकटून काढले. घराच्या शयनगृहातील लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेले.