पुणे : ‘भविष्यात पुण्याची ओळख जागतिक पर्यटन केंद्र म्हणून व्हावी, यासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून पुण्यात पुढील वर्षी जानेवारीमध्ये महिनाभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. या स्पर्धांच्या निमित्ताने जगभरातील पर्यटक पुण्यात येतील,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शुक्रवारी दिली. क्रेडाई – पुणे मेट्रोच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डूडी बोलत होते. ते म्हणाले, ‘जिल्ह्याचा इतिहास, वारसा, भौगोलिक स्थळे, गड-किल्ले यांच्या पर्यटन क्षमता मोठ्या असून, एकात्मिक पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे. पुण्याला जागतिक पातळीवरील पर्यटन केंद्र बनविण्याचे नियोजन आहे. यासाठी सरकारी खर्च न करता खासगी क्षेत्राचा जास्तीत जास्त सहभाग घेतला जात आहे.’

‘पुण्यात पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पुणे ग्रँड सायकल चॅलेंज ही स्पर्धा होईल. फ्रान्समधील टूर डी फ्रान्सच्या धर्तीवर ही स्पर्धा असेल. या स्पर्धेत जगभरातील स्पर्धक सहभागी होतील. या निमित्ताने स्पर्धेच्या मार्गावरील जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त आणि चकाचक होतील. पुण्यात पॅराग्लायडिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप, हॉट एअर बलून फेस्टिव्हल पुढील वर्षी जानेवारीत होतील,’ असे त्यांनी सांगितले.

‘जानेवारीमध्ये महिनाभर विविध स्पर्धा आणि महोत्सव सुरू राहणार आहेत. त्यामुळे या निमित्ताने पुण्यात महिनाभर जागतिक पर्यटक येतील आणि पर्यटनाला चालना मिळेल. जगातून पर्यटक आल्यामुळे विविध क्षेत्रांतील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. या माध्यमातून पुण्याची ओळख जागतिक पातळीवर पर्यटन केंद्र म्हणून होईल,’ असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘दिल्लीसारखी स्थिती होऊ नये!’

वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येकडे पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांची वाढ वेगाने होत आहे. याच वेळी वायू आणि जल प्रदूषणात वाढ होत आहे. शहरातील ४० टक्के वायू प्रदूषण बांधकामांमुळे होते. त्यामुळे बांधकाम क्षेत्राने हे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वायू प्रदूषण रोखण्यासाठी वेळीच पावले न उचलल्यास दिल्लीसारखी स्थिती होऊ शकते. शहराची वाढ होताना पाण्याची टंचाईसुद्धा जाणवत आहे. त्यामुळे जलस्त्रोतांचे जतन करण्याची आवश्यकता आहे.’