पुणे : राज्यात व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीबीएम, बीएमएस) आणि संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणखी एक समाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. त्यासाठीची अर्जनोंदणी गुरुवारपासून (१२ जून) सुरू होणार असून, या एप्रिलमधील सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाही दुसऱ्यांदा होणारी सीईटी देण्याची मुभा आहे. मात्र, दोन्ही सीईटीतील सर्वोत्तम पर्सेंटाईल गुण प्रवेशप्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. बीबीए, बीबीएम, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमाची एप्रिलमध्ये झालेली सीईटी काही विद्यार्थी देऊ शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हिताचा विचार करून, या अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण होण्याच्या दृष्टीने अतिरिक्त सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सीईटी सेलने घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या बीबीए, बीबीएम, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमासाठीची सीईटी दोनवेळा आयोजित करण्यात येत आहे.

सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासक्रमास सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जनोंदणी आणि अर्ज निश्चिती करता येणार आहे. अर्ज नोंदणीसाठी २० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर सीईटीची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. एप्रिलमध्ये झालेल्या सीईटीचे विद्यार्थीही अतिरिक्त सीईटी देऊ शकतात. मात्र, दोन्ही सीईटीतील सर्वोत्तम पर्सेंटाईल गुण प्रवेशप्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम पर्सेंटाईल असलेले गुण संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.