पुणे : दिवाळीत अनेकजण परगावी गेले आहेत. एरवी शहरातील गजबलेले रस्तेही मोकळे झाले आहेत. भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडण्याची शक्यता असून, वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना वेगमर्यादेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहर, तसेच उपनगरात मोठ्या संख्येने बाहेरगावाहून नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. अनेक विद्यार्थी स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी, तसेच विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी शहरातील मध्यभागात वास्तव्यास आले आहेत. दिवाळीत परगावाहून वास्तव्यास आलेले अनेकजण मूळगावी परतात, तसेच काहीजण पर्यटनासाठी बाहेरगावी जातात. नरकचतुदर्शच्या आदल्या दिवशी अनेकजण मूळगावी रवाना झाल्याने शहरातील गजबलेल्या रस्त्यांवरील वाहतूक गेल्या दोन दिवसांपासून कमी झाली आहे.
‘शहरातील गर्दीच्या रस्त्यावर सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रस्ते मोकळे झाल्याने वाहनचालक भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले आहे. भरधाव वेगामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे. ‘मोकळे रस्ते म्हणजे सुरक्षित रस्ते’, असा समज करून वाहनचालकांनी भरधाव वेगाने वाहने चालवू नयेत. वाहनचालकांनी सिग्नल मोडू नये. वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण करू नये. मोटारचालकांनी आसनपट्ट्यांचा (सीटबेल्ट) वापर करावा, तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे. मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत,’ असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
वाहनचालकांना सूचना
– वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे
– सिग्नल तोडू नये
– मोटारचालकांनी सीटबेल्टचा वापर करावा
– दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे
– मद्यप्राशन करू वाहन चालवू नये
वेगात नव्हे; सुरक्षिततेत आनंद
मोकळ्या रस्त्यांवर वाहनचालकांनी भरधाव वेगाने वाहने चालवून नये. दिवाळी सुरक्षितपणे साजरी करावी. वेगात नव्हे, तर सुरक्षिततेत आनंद आहे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.