पुणे : खानवडी येथील ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे. या शाळेच्या संचालनासाठी पुणे जिल्हा परिषद, राज्य सरकार आणि क्रिस्टल हाऊस इंडिया या संस्थेमध्ये करार करण्यात आला असून, शाळेत सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे.

करारावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, क्रिस्टल हाऊस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन मॅथ्यू उपस्थित होते. फुले कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या खानवडीमध्ये त्यांच्या विचारांचे स्मारक उभारण्यासाठी खानवडी ग्रामस्थ, पुणे जिल्हा परिषद, पेन्सिव्ह आर्किटेक्चर कंपनीने वंचित घटकांसाठी शाळा उभारण्याचा निर्णय घेतला.

फियाट इंडिया कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून या शाळेची इमारत उभी राहिली. १२ एकरांत असलेली ही शाळा एप्रिल २०२६मध्ये कार्यान्वित करण्यात येईल. पुढे वंचित घटकांतील एकूण १८५० विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण, पोषण आहार, वाहतुकीची सोय, शैक्षणिक साहित्य, आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. पुढील टप्प्यात पाचवी आणि सहावीपासून गरजू मुलींसाठी निवासी सुविधाही सुरू करण्याचे नियोजन आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, ‘पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्रातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतून ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल साकारत असल्याचा आनंद आहे. या शाळेच्या माध्यमातून खानवडी परिसरातील वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण मोफत मिळेल, याचा विश्वास आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक मुलाला समान आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची आहे.’