घरी बोलवून दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी कराटे शिक्षकास न्यायालयाने दहा वर्षे तुरुंगवास आणि १७ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. कोंढव्यात हा प्रकार घडला होता. असिफ रफिक नदाफ (वय ३१,रा. कोंढवा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर २०१८ मध्ये कोंढवा पोलीस ठाण्यात अत्याचार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा- पुणे : कसब्यात १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
पीडित मुलगी कोंढवा येथे आरोपीच्या कराटे क्लासमध्ये कराटे शिकण्यास जात होती. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे सांगून त्याने तिला घरी बोलवले. घरी कोणी नसताना तो तिला घरी घेऊन गेला. आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने वेळोवेळी अल्पवयीन मुलीस घरी बोलवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आई-वडिलांची घरात सारखी भांडणे होत असल्याने घाबरलेल्या मुलीने कराटे शिक्षक त्रास देत असल्याचे घरात कोणाला सांगितले नाही. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार कुटुंबीयांना समजला. त्यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेच्या वेळी मुलगी अल्पवयीन असल्याने तिची तथाकथित संमती ग्राह्य धरता येणार नाही, असे मुद्दे लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. प्रमोद बोंबटकर यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.