पुणे : कोकणातील हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, कर्नाटकातून आंब्यांची आवक वाढली आहे. हापूसप्रमाणे चव असलेल्या कर्नाटकातील आंब्यांना गेल्या काही वर्षांपासून मागणीही वाढत आहे. यंदा वातावरणातील बदलामुळे हापूसची लागवड कमी झाली आहे. कर्नाटकातील आंबा जूनपर्यंत बाजारात उपलब्ध असेल.

कर्नाटकातील तुमकूर भागात आंब्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कर्नाटकातील आंब्याची चव हापूसप्रमाणेच आहे. दर वर्षी कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम १५ एप्रिलपर्यंत सुरू होतो. यंदा कर्नाटक आंब्यांचा हंगाम १५ दिवस उशिराने सुरू झाला. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आवकही चांगली होत आहे.

‘यंदा हापूसचा हंगाम लवकर संपणार आहे. देवगड, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून होणारी आंब्याची आवक कमी झाली आहे. कर्नाटक आंब्यांचा हंगाम साधारणपणे १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. बाजारात हापूस उपलब्ध नसल्याने ग्राहकांकडून कर्नाटक आंब्यांच्या मागणीत वाढ होईल,’ अशी शक्यता श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कर्नाटक आंब्यांचे व्यापारी रोहन उरसळ यांनी व्यक्त केली.

‘मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी (४ मे) कर्नाटकातून पाच हजार ते सात हजार लाकडी पेट्यांची आवक झाली. एका पेटीत तीन डझन ते पाच डझन आंबे असतात. कर्नाटकातील आंब्यांची दोन डझनांची खोकी विक्रीस उपलब्ध आहेत. बाजारात रविवारी २० हजार खोक्यांची आवक झाली. तसेच, लालबाग, पायरी, बदाम या जातीच्या आंब्यांची पाच हजार प्लास्टिक जाळ्यांमधून (क्रेट) आवक झाली,’ असे त्यांनी नमूद केले.

कर्नाटक आंब्यांचे दर

कर्नाटक हापूस तीन ते पाच डझन पेटी – १००० ते १६०० रुपये

कर्नाटक हापूस दोन डझन पेटी – ३०० ते ५०० रुपये

पायरी चार डझन पेटी – १००० ते १५०० रुपये

लालबाग – ४० ते ६० रुपये किलो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदाम – ४० ते ५० रुपये किलो