भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा मतदार संघात रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा १० हजार ५०० मतांनी पराभव केला आहे. या निकालानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपाला टोला लगावला आहे. पैशांच्या जोरावर मराठी माणसाला विकत घेता येत नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मूळचे आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातले आहेत. त्यांचा विजय हा आनंद द्विगुणित करणारी बाब आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केलेल्या संघटित प्रयत्नांचा हा विजय आहे. मराठी माणूस पैशांत विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. राजकीय पक्षापेक्षा हा विजय कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे या विजयाचं खरं श्रेय कार्यकर्त्यांना जातं असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं असून भाजपाला टोला लगावला आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलं आहे.

२८ वर्षे भाजपचा बालकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघात सत्तांतर झालं आहे. रविंद्र धंगेकर यांना एकूण ७३ हजार १९४ इतकी मते मिळाली असून त्यांनी ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला आहे. भाजपासाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो आहे. कारण भाजपाने ही निवडणूक जिंकण्यासाठी सगळी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र या निवडणुकीत भाजपाला पराभव सहन करावा लागला आहे.

रवींद्र धंगेकर यांनी विजयानंतर काय म्हटलं आहे?
कसब्यात पैशांचा धूर झाला. पैशांच्या धुरात भाजपा आणि शिंदे सरकार जळून खाक झालं आहे. पण महाराष्ट्रातल्या राजकारणाची चांगली परंपरा म्हणून मी गिरीश बापट यांची भेट घेणार आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत. ते इतका काळ या ठिकाणी खासदार होते त्यामुळे मी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार आहे. कसब्यातल्या या निवडणुकीत भाजपाने खूप पैसा ओतला. मागचे पंधरा दिवस पैशांचा पाऊस पडला होता पण लोकांनी त्यांना जागा दाखवली असंही रवींद्र धंगेकर यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kasba by poll 2023 ncp mp supriya sule reaction kasba election she taunts bjp about this scj
First published on: 02-03-2023 at 20:05 IST