पुणे : मृत्युंजय प्रतिष्ठान आणि ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती समिती यांच्या वतीने माजी पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते इतिहासाचे अभ्यासक, लेखक डॉ. केदार फाळके यांना ‘‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्कारा’ने, तर वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना ‘‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृति समाजकार्य पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.

डॉ. सागर देशपांडे, मृणालिनी शिवाजीराव सावंत, अमिताभ सावंत आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. केदार फाळके यांनी ‘वर्तमानकाळासाठी शिवचरित्र’ या विषयावर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘इतिहास हा केवळ साधनांनी लिहिला जातो. राजकीय हस्तक्षेपामुळे इतिहासाचा विपर्यास केला जातो. मात्र, राजकीय दबावाला झुगारुन परिणामांची चिंता न करता फक्त आणि फक्त काम करत रहा अशी शिकवण गजानन मेहेंदळे यांनी दिली. त्यांनी स्वतः निर्भिडपणे संशोधन केले. इतिहासाचे अनेक पदर त्यांच्यामुळेच समोर आले आहेत. इतर कोणत्याही इतिहास अभ्यासकाच्या लक्षात न आलेले, दुर्लक्षित संदर्भ त्यांनी टिपले.’

‘संशोधक कसा असावा याचे उत्तम उदाहरण’

‘पत्रके आणि पुरावे सर्वांसाठी तेच असतात. मात्र, संशोधकाने अत्यंत बारकाईने त्याकडे पाहणे गरजेचे असते. संशोधक कसा असावा, त्याची दृष्टी कशी असावी याचे उत्तम उदाहरण गजानन मेहेंदळे यांनी घालून दिले,’ असे फाळके यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘औरंगजेब दुसऱ्यांदा दक्षिणेत सुभेदार म्हणून आला. त्यानंतरच्या काळातील इतिहासाचे अनेक घटना, घडामोडी यांच्यावर मेहेंदळे यांनी प्रकाश टाकला. जदुनाथ सरकार यांच्यानंतर त्यांनीच ‘बादशहानामा’ या साधनाचा मोठ्या हुशारीने उपयोग केला. मेहेंदळे यांना भाषेची अचूक जाण होती. त्यामुळे पत्र, लेख आदी साधनांमध्ये वापरलेल्या शब्दांचे नेमके अर्थ लावणे त्यांना जमले. कोणाच्याही लक्षात न आलेल्या इतिहासातील अनेक गोष्टी मेहंदळे त्यांना टिपता आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले निर्णय, मारलेले छापे आणि त्यामागची भूमिका यांचे विश्लेषण पुराव्यानिशी करता आले. मेहंदळे यांनी इतर कोणत्याही शिवचरित्रात नसलेले संदर्भ, घटना घडामोडींचे विश्लेषण आणि त्यांची व्यवस्थित मांडणी केली.’

‘…ही गजानन मेहेंदळे यांना खरी श्रद्धांजली’

‘प्रत्येकाने स्वतःच्या क्षमता ओळखून त्या विस्तारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मेहेंदळे नेहमी सांगत. त्याप्रमाणे वागणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी असलेले गुण प्रत्यक्ष जीवनात उतरवण्यासाठी प्रयत्न करणे हीच गजानन मेहेंदळे यांना खरी श्रद्धांजली असेल,’ अशी भावना फाळके यांनी व्यक्त केली.

पुरस्कार मेहेंदळे यांना समर्पित

दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी त्यांचा पुरस्कार इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांना समर्पित केला. मेहेंदळे यांनी मोलाचे योगदान दिले असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.