पुणे : राज्यातील केशर आंबा साधारण एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या सुरुवातीस बाजारात येतो. मात्र, यंदा मार्चअखेरीस केशर बाजारात दाखल झाला असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच मोठ्या प्रमाणावर केशर आंबा बाजारात उपलब्ध असेल.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळांचे व्यापारी संजय पानसरे म्हणाले, सांगोला, धाराशिव, मराठवाडा, खानदेशातील केशर आंबा मुंबई, पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे. केशरला १५० ते १७० रुपये किलो दर मिळत आहे. केशर मार्चच्या अखेरीस किरकोळ प्रमाणात बाजारात आला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर केशर बाजारात दाखल होईल.

हेही वाचा >>>निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?

यंदा केशरला चार-पाच टप्प्यात मोहोर आला आहे. एकाच झाडावर काढणीला आलेला, पक्व झालेला आंबा, कैरी स्वरुपातील आंबा, लिंबाच्या आकाराचा आंबा आणि नुकताच मोहरातून बाहेर येऊन लिंबोळीच्या आकाराचा आंबा दिसत आहे. पहिल्या टप्प्यातील मोहरापासून आलेल्या आंब्याची काढणी पंधरा एप्रिलपासून सुरू झाली आहे. यंदा मार्चच्या मध्यापासून जूनअखेरपर्यंत केशर आंबा बाजारात असेल, अशी माहिती महाकेशर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कोकण वगळता राज्यभरात केशर आंबा लागवडीखालील क्षेत्र सुमारे ५३,००० हेक्टरवर आहे. प्रत्यक्षात, फळ देणारी झाडे फक्त पंधरा हजार हेक्टरवर आहेत. बाकी शेतकऱ्यांनी फक्त अनुदान मिळवण्यासाठी आंब्याची लागवड केली किंवा पुरेशी काळजी न घेतल्यामुळे झाडे जळून गेली आहेत. यंदा सरासरी इतके उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>पुणे : कोथरूडमध्ये पोपट विकणारे तिघे अटकेत, दोन पोपट वन विभागाकडून जप्त

केशर-हापूसची बाजारात स्पर्धा

साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून एप्रिलअखेरपर्यंत बाजारात हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. या कैळात अन्य जातीचे आंबे बाजारात कमी प्रमाणात असल्यामुळे हापूस आंब्यांना चांगला दर मिळतो. मात्र, यंदा एप्रिलपासूनच केशर आंबा बाजारात दाखल झाल्यामुळे ग्राहकांना हापूसला केशरचा पर्याय उपलब्ध असणार आहे. बाजारात हापूस आणि केशरची स्पर्धा होणार आहे. सध्या केशर १५० ते १७० रुपये किलो तर हापूस ८०० ते १५०० रुपये डझन आहे, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजारातील व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नैसर्गिक आपत्तींचा धोका

यंदा केशरला चार टप्प्यात मोहोर आला आहे. एकाच झाडावर काढणीला आलेली फळे आणि लिंबोळीच्या आकाराची फळे आहेत. उन्हाच्या झळा, वादळी वारे, अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या हाती किती आंबा येतो, याची काहीच शाश्वती नाही, असे मत महाकेशर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली.