पुणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उद्योगांसाठी पाणीपट्टीत वाढ केली आहे. यात पुण्यातील खराडी आयटी पार्कमध्ये पाण्याचा दर राज्यात सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. खराडीनंतर बीड, मुंबई महानगर आणि पिंपरी-चिंचवडसह हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये हा दर जास्त आहे.

‘एमआयडीसी’ने या महिन्यापासून पाणीपट्टीत वाढ केली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडून सातत्याने वाढत असलेला पाणीदर आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने केलेली दरवाढ यामुळे पाणीपट्टी वाढविण्याचे पाऊल उचलल्याचे ‘एमआयडीसी’चे म्हणणे आहे. ‘एमआयडीसी’कडून उद्योगांसाठी प्रत्येक औद्योगिक क्षेत्रानुसार पाण्याचा दर वेगवेगळा आकारला जातो. राज्यात खराडी आयटी पार्कमध्ये सध्या प्रतिहजार लिटरसाठी सर्वाधिक १०२.७५ रुपये दर आहे. हा दर वाढून १०४.७५ रुपयांवर जाणार आहे. बीडमध्ये उद्योगांसाठी पाण्याचा दर आता प्रतिहजार लिटरला ३२.७५ रुपये झाला आहे. त्या खालोखाल मुंबई महानगर परिसरात २६ आणि पिंपरी-चिंचवड, चाकण, तळवडे आणि हिंजवडीत हा दर २४.२५ रुपये झाला आहे.

‘एमआयडीसी’कडून खराडी आयटी पार्कमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पाण्याचा वापर केला जातो. महापालिका ‘एमआयडीसी’ला व्यावसायिक दराने पाणीपट्टीची आकारणी करते. महापालिकेचा पाणीपट्टीचा व्यावसायिक दर प्रतिहजार लिटर ८८.३५ रुपये आहे. ‘एमआयडीसी’कडून खराडी आयटी पार्कमध्ये पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. तेथून जलवाहिन्यांतून हे पाणी ‘एमआयडीसी’ तेथील ग्राहकांना पुरवते. या ठिकाणच्या यंत्रणेची दुरुस्ती व देखभाल, विजेचा खर्च, कर्मचाऱ्यांवरील खर्च आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा खर्च यांची आकारणी ‘एमआयडीसी’ पाणीपट्टीत करते. त्यामुळे खराडी आयटी पार्कमध्ये पाण्याचा दर आता प्रतिहजार लिटर १०४.७५ रुपयांवर जाणार आहे. या ठिकाणी दररोज सुमारे दीड लाख लिटर पाण्याची मागणी असते, अशी माहिती ‘एमआयडीसी’तील सूत्रांनी दिली.

परिपत्रकामुळे गोंधळ

‘एमआयडीसी’ने पाणीपट्टीतील वाढीबाबत काढलेल्या पत्रकावरून गोंधळ निर्माण झाला आहे. या परिपत्रकात खराडी आयटी पार्कमधील पाण्याचा नवीन दर प्रतिहजार लिटर ४०.७५ रुपये नमूद करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा दर १०४.७५ रुपये असायला हवा होता. त्यामुळे आधीच्या परिपत्रकात सुधारणा करून नवीन दराचा समावेश करावा, यासाठी ‘एमआयडीसी’च्या मुख्यालयाकडे पुण्यातील कार्यालयाने प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे लवकरच नवीन दर खराडी आयटी पार्कमध्ये लागू होतील, असे ‘एमआयडीसी’तील सूत्रांनी सांगितले.

पुणे महापालिकेकडून घरगुती ग्राहक आणि व्यावसायिक अशी पाणीपट्टीची आकारणी केली जाते. खराडी आयटी पार्कमध्ये व्यावसायिक दराने ‘एमआयडीसी’ला पाणी दिले जाते. हा दर प्रतिहजार लिटर ८८.३५ रुपये आहे. जलसंपदा विभागाकडून आकारण्यात येत असलेल्या दरानुसार या दरांची आकारणी केली जाते. – प्रसन्न राघव जोशी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका