चॉकलेट आणि बिस्किटचे आमिष दाखवून सहा वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्याला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. १६ दिवसांनी चाकण पोलिसांनी मुलाला सुखरूप शोधून काढल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. पारख उमेश सूर्यवंशी अस अपहरणातून सुखरूप सुटका केलेल्या मुलाचे नाव आहे. सुरेश उर्फ सुऱ्या लक्ष्मण वाघमारे अस बेड्या ठोकण्यात आलेल्या अपहरणकर्त्याचे नाव आहे.
आई आणि वडील कामावर गेल्यानंतर पटांगणात खेळत असलेल्या पारखला किराणा दुकानात नेवून चॉकलेट आणि बिस्किटाचे अमिश दाखवून त्याचे अपहरण केले. सुऱ्या हा भंगार गोळा करण्याचे काम करतो. मुलगा घरात, परिसरात कुठे दिसत नाही असे कळताच त्यांनी तात्काळ चाकण पोलिसांत तक्रार दिली. मुलाचे अपहरण झाल्याची घटना असल्याने चाकण पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करण्यास सुरुवात केली.
चाकण आणि परिसरातील शेकडो सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. अपहरण झालेल्या पारखचे फोटो, माहिती सोशल मीडिया, पुणे, रायगड, ठाणे, अहमदनगर जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वे स्थानकात भिंती पत्रके लावण्यात आली. १६ दिवसांचा अवधी लोटल्यानंतर आज सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना मावळ मधील वेहरगावचे पोलिस पाटील अनिल पडवळ यांचा फोन आला. त्यानंतर तपासाला वेग आला आणि फोटोतील मुलगा आणि अपहरणकर्त्याला शोधण्यास पोलिसांना यश आले. चाकण पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन पारखला सुखरूप परत आणले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.