राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नवाब मलिक व माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. राज्यसभेच्या १० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा एक दिवसाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायालयाने आज (गुरुवार) या संदर्भात निर्णय देत मतदानासाठी जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

किरीट सोमय्या पुण्यात माध्यामांशी बोलताना म्हणाले, “हे तर होणारच होतं, उद्धव ठाकरेंच्या गालावर न्यायालयाने बारावी झापड मारली आहे. माफिया सरकारच्या माफिया सरदारला असं वाटतय, की गुंडांसारखं राज करायचं. परंतु हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत मान्य नाही. उद्धव ठाकरे यांनी दाऊदच्या एजंटला मंत्रिमंडळात ठेवलं अन् महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं मी की मी ठेवणार. आता पाहा काय होतय ते, आता कळेल त्यांना आणि अशी माफियागिरी करणाऱ्या सरकारला न्यायालय अशाच पद्धतीने अनेक धडे शिकवले आहेत, शिकवत राहणार आणि शेवटचा धडा महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनता शिकवणार.”

Rajya Sabha Election : महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ; देशमुख-मलिकांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळलाउत्तर दिलं.

तसेच माध्यामांनी यावर ते उच्च न्यायालयात जाणार असल्याचं सांगितल्यावर, “त्यांना जायचं तिथे जाऊ द्या. ठाकरेंना झापडच खायची आहे. संजय राऊतला न्यायालयाने कशी झापड लागवली हे विसरलात?, १०० कोटींचा मेधा सोमय्यांचा घोटाळ्याच्या आरोपा प्रकरणी न्यायालायने आज समन्स काढलं आहे, संजय राऊत हाजीर हो. मेधा किरीट सोमय्यांची याचिका दाखल झाली, ४ जुलै रोजी संजय राऊतला न्यायालयात यावं लागणार.” असं किरीट सोमय्यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, राज्यसभेच्या जागेसाठी तुम्हाला संधी दिली गेली नाही, याबद्दल तुम्हाला खंत वाटत नाही का? असा जेव्हा सोमय्यांना प्रश्न करण्यात आला तेव्हा सोमय्यांनी “महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेने मला खूप मोठं काम दिलय. की हे जे महाराष्ट्राची वाट लावणारी माफियागिरी, ५० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या लोकांना योग्य ठिकाणी पोहचवायचं आणि साडेबारा कोटी जनतेचं रक्षण करण्याचं काम सध्या माझ्याकडे आहे, ते पूर्ण होईपर्यंत दुसरं काही नको.” अशा शब्दांमध्ये उत्तर दिलं.