पुणे : अभिमानश्री सोसायटीकडून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूर्वसूचना न देता जलवाहिनी टाकण्यासाठी नव्याने केलेल्या रस्त्याची खोदाई कनिष्ठ अभियंता आणि एल ॲण्ड टी कंपनीला भोवली आहे. विनापरवाना खोदाई करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकासन केल्याप्रकरणी एल ॲण्ड टी कंपनीला ८ लाख ७७ हजार ८२४ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> वानवडीत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा सोसायटीच्या आवारात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ

अभिमानश्री सोसायटीकडून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदाई करण्यात आल्याची बाब अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या निदर्शनास आली होती. या रस्त्यावर जलवाहिनी टाकल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, हा रस्ता पुन्हा खोदल्यामुळे कनिष्ठ अभियंत्याकडे त्यांनी विचारणा केली, तेव्हा जलवाहिनीच्या कामासाठी अत्यावश्यक काम म्हणून खोदाई करण्यात आल्याचे अभियंत्याकडून सांगण्यात आले. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनीचे काम करण्यासाठी एल ॲण्ड टी कंपनीला परवानी देण्यात आली होती. ही परवानगी ३१ ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतरही ही खोदाई करण्यात आल्याचे चौकशीत आढळून आले. त्यामुळे विना परवाना केलेली खोदाई सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारी असल्याने पथ विभागाने ८ लाख ७७ हजार ८२४ रुपयांच्या दंडाची नोटीस एल ॲण्ड टी कंपनीला बजावली. तसेच खोटी माहिती दिल्याने कनिष्ठ अभियंत्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.