पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्यात येणार आहे. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तटकरे यांनी हा इशारा दिला. माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, म्हाडाच्या पुणे विभागाचे अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
‘लाडकी बहीण योजनेचा लाभ काही शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे पुढे आले आहे. त्या तक्रारींची तपासणी सुरू झाली आहे. त्यामध्ये दोषी आढळलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जाईल आणि ती कोषागारात जमा केली जाईल. तसेच त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई ही करण्यात येईल,’असे तटकरे यांनी सांगितले.
‘महिलांच्या सक्षमीकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे मोठे योगदान आहे.’ असे तटकरे म्हणाल्या. वळसे-पाटील म्हणाले,‘महिलांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दहा लाख रुपयांपर्यंतचा कर्जपुरवठा केला जात आहे. उद्योग व्यवसाय उभारणीसाठी महिलांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.’