पुणे : क्वीन्स गार्डन परिसरात मोटारीची काच फोडून चोरट्यांनी लॅपटाॅप लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका मोटारचालकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोटारचालक हे विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. रविवारी (६ जुलै) ते दुपारी सव्वाबाराच्या सुमारास क्वीन्स गार्डन भागात आले होते. त्यांनी विधानभवन परिसरातील एका गल्लीत मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीत ठेवलेला ३५ हजारांचा लॅपटाॅप, तसेच लेझर मेजरिंग टेप असा मुद्देमाल लांबविला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी महिलेची बांगडी लंपास
पीएमपी प्रवासी महिलेच्या हातातील ७० हजारांची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावर घडली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पद्मावती परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या शनिवारी (५ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास स्वारगेट ते पद्मावती या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या. त्यांच्याबरोबर मुलगा आणि सून होती. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी महिलेच्या हातातील बांगडी कटरचा वापर करून कापून नेली. पद्मावती परिसरात त्या बसमधून उतरल्या. तेव्हा हातातील बांगडी चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.