पुणे : मुलीच्या शाळेतील प्रवेशावरून वाद झाल्यानंतर महिलेने एका आपल्या मित्राच्या साथीने ‘लिव्ह इन’ मधील जोडीदाराला रॉकेल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. येरवडा शास्त्रीनगर येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्डजवळील सैनिक बँकसमोर मंगळवारी (२५ जुलै) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मुकेश सुरेश राजपूत (वय ४२, रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे पेटवून दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजपूत हे चाळीस टक्के भाजले असून, त्यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले. याप्रकरणी, येरवडा पोलिसांनी उज्ज्वला दत्तात्रय कांबळे (वय ४४), राजेश जगताप (वय ५५, रा. गणपती मंदिराजवळ, शास्त्रीनगर येरवडा) या दोघांना अटक केली आहे. राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘मोक्का पॅटर्न’, २१ टोळ्यांतील २०९ गुन्हेगार गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजूपत आणि आरोपी महिला उज्ज्वला या दोघांचेही विवाह झाले असून, गेल्या पंधरा वर्षांपासून ते दोघे ‘लिव्ह इन’मध्ये एकत्र राहत होते. त्यांना दोघांना एक मुलगी आहे. तिला शाळेत घालण्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद होता. तर, राजेश जगताप याच्यासोबत उज्ज्वला हिचे मैत्रीचे संबंध आहेत. हे राजपूत याला आवडत नव्हते.

हेही वाचा – पुणे : खडकवासला धरणातून आता ८५६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजपूत हा शास्त्रीनगर परिसरात रिक्षा घेऊन थांबला होता. त्यावेळी राजेश हा त्याला घराच्या परिसरात दिसला. त्याने उज्ज्वला हिच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी तिने राजपूत याच्यासोबत वाद घालून ‘मी काय तुझ्यासोबत लग्न केले आहे का’ असे म्हटले. त्यांच्यात बाचाबाची झाली असता, उज्ज्वला हिने घरात जाऊन पाच लिटर रॉकेलचा डबा आणून ते राॅकेल राजपूत याच्या अंगावर ओतले. त्यानंतर लायटरने त्याला पेटवून दिले. दोघांनी रिक्षात बसून तेथून पळ काढला होता. राजपूत पेटल्याचे पाहून काही लोकांनी त्याला वाचविले आणि रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलिसांना दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.