अजित पवार यांची टीका

पिंपरी : भाजप सरकारने फक्त खोटी आश्वासने दिली. ते सामान्यांचे नव्हे तर धनदांडग्यांचे सरकार आहे. शिवसेनेच्या वाघाची अवस्था सध्या वाईट असून त्यांनी कायमच सोयीचे राजकारण केल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

सांगवीतील निळूभाऊ फुले नाटय़गृहात आयोजित दलित पँथर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.

भाजपने देश आणि राज्य कर्जबाजारी केल्याचे सांगून पवार म्हणाले, मोदींचा कारभार हुकूमशाही पद्धतीचा आहे. देशात लोकशाही संकटात आहे. नोटाबंदीमुळे देशाची वाट लागली आहे. देशभरात महिलांवरील अत्याचार वाढले. शेतक ऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. कामगार देशोधडीला लागले. बेरोजगारी वाढली. महत्त्वांच्या प्रश्नांना बगल दिली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दिलेले पुणे जिल्ह्य़ातील चारही उमेदवार सुशिक्षित आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

..ते कोणत्याही थराला जातील

सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे चक्र सध्या सुरू आहे. गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असल्याने निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद अशा सर्व नीती वापरत ते कोणत्याही थराला जाऊ शकतील. कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, असे आवाहन अजित पवारांनी या वेळी केले.