पुणे : पवना धरण परिसरात ठाकुरसाई गावातून निघालेल्या एकट्या महिलेला दुचाकीवर आलेल्या आरोपीने धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने २४ तासांत रेखाचित्रावरुन आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. बाळू दत्तु शिर्के असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिर्केविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पीडित महिला डोंगराळ भागात राहायला आहे. १५ जुलै रोजी ती पवना धरण परिसरातील ठाकूरसाई गावातील रस्त्याने निघाली होती. पीडित महिला एकटी असल्याचे शिर्केने पाहिले. त्याने तिचा पाठलाग केला. दुचाकी आडवी घालून महिलेला थांबविले. तिला जिवे मारण्याची धमकी दिली. निर्जन भागात नेऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, पाऊस सुरू असल्याने या भागात कोणी नव्हते. महिलेवर बलात्कार करुन आरोपी पसार झाला.
या घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने पतीला या घटनेची माहिती दिली. मात्र, पतीने तिला धीर न देता तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला घराबाहेर काढले. त्यानंतर महिला आईकडे गेली. तिने तिला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर १६ जुलै रोजी तिने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडित महिलेची पोलिसांनी चौकशी केली.
महिलेने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार केले. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पसार झालेला आरोपी शिर्के याला २४ तासांच्या आत अटक केली. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक निरीक्षक प्रशांत आवारे, राहुल गावडे, दत्ताजी मोहीते, तसेच पोलीस कर्मचारी अभिजित सावंत, प्रकाश वाघमारे, सचिन घाडगे, दीपक साबळे, आसिफ शेख, विक्रम तापकीर आणि पथकाने ही कारवाई केली.