पुणे : सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) गुरुवारी मोठी वाहतूक कोंडी झाली. महामार्ग वाहतूक पोलिसांनी २२ वाहतूक पोलीस कर्मचारी आणि चार वरिष्ठ अधिकारी नेमलेले असतानाही अनेक वाहने कोंडीत अडकून पडली, इतकी मोठी गर्दी गुरुवारी झाली.
लोणावळा, खंडाळा घाट परिसरामध्ये साधारणतः सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्ग वाहतूक निय़ंत्रण पोलिसांचीदेखील दमछाक झाली. सुट्यांचा पहिलाच दिवस वाहतूक कोंडीत घालवावा लागल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
पतेतीच्या सुटीला जोडून या आठवड्यात शुक्रवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिन आणि नंतर शनिवार-रविवार अशा सलग चार सुट्या आल्या आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक गुरुवारी सकाळी लवकरच पर्यटनासाठी बाहेर पडले. मात्र, पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस वे’वर लोणावळा ते खंडाळादरम्यान सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसल्याने अनेक पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला. वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांनी समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. अनेक पर्यटक आज, शुक्रवारी बाहेर पडण्याची शक्यता असल्याने शुक्रवारीही अशीच कोंडी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
द्रुतगती मार्गावर खासगी वाहनांबरोबरच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेलाही फटका बसला. या मार्गावरून संथ गतीने वाहतूक होत असल्याने स्वारगेट आगारातून सकाळी निघालेल्या ‘ई-शिवनेरी’ दादर, ठाणे स्थानकात पोहोचण्यास तब्बल तीन तासांचा विलंब झाला. ही वाहने इलेक्ट्रिक आहेत. कोंडीमुळे त्यांच्या चार्जिंग क्षमतेवर परिणाम होत असल्याची तक्रार आहे.
‘पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाप्रमाणेच मुंबई-बंगळुरू महामार्गावरील सातारा, कराड, महाबळेश्वरपर्यंत अतिरिक्त वाहतूक नियंत्रण पोलीस तैनात करण्याचे आदेश स्थानिक महामार्ग पोलिसांना दिले आहेत. तसेच वाहने बंद पडण्याची शक्यता लक्षात घेऊन मदत कक्ष, क्रेन आणि इतर सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे महामार्ग पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी सांगितले.
सलग सुट्या आल्याने अनेक जण मोठ्या प्रमाणात गावी जाण्यासाठी किंवा पर्यटनासाठी बाहेर पडतात. पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर नेहमीपेक्षा जास्त म्हणजे २२ वाहतूक नियंत्रण कर्मचारी व चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र, रस्त्यांवरील वाहनांची संख्या जास्त होती. हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक कोंडी सोडविण्यात आली. शुक्रवारी अधिक कर्मचारी नेमण्यात येतील. – विक्रांत देशमुख, महामार्ग पोलीस अधीक्षक