पुणे : रात्री अपरात्री शहर, तसेच उपनगरातून फटाके किंवा बंदुकीतून गोळी सुटल्याप्रमाणे आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर बुलेटचालक करतात. मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या नागरिक फटाक्यासारख्या आवाजामुळे दचकून जागे होतात. कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. २५ बुलेटचालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याविरुद्ध दंडात्म कारवाई केली, तसेच सायलेन्सर जप्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत नागरिकांनी केले आहे.

लोणी काळभोर भागात बुलेटचालक तरुण भरधाव वेगाने जातात. कर्णकर्कश सायलेन्सरमधून फटाके फुटल्यासारखे आवाज येतात,अशा तक्रारी या भागातील नागरिकांनी पोलिसांकडे केल्या होत्या. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी कारवाईसाठी विशेष पथक तयार केले. या पथकात चार अधिकारी, १५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. लोणी काळभोर परिसरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या पथकाने कारवाई करुन २५ बुलेटचालकांविरुद्ध कारवाई केली. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सर असणाऱ्या बुलेट ताब्यात घेण्यात आले. कारवाई करण्यात आलेल्या बुलेट लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बुलेटचे सायलन्सर पोलिसांनी जप्त केले. अशा प्रकारचे सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. बुलेटचालकांकडून २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

बुलेट गाड्यांना कर्णकर्कश आवाज असणारे सायलेन्सर बसविण्यात येतात. अशा प्रकारच्या सायलेन्सरवर बंदी घालण्यात आली आहे. नाना पेठेतील वाहनांचे सुटे भाग विक्री करणारे काही दुकानदार अशा प्रकारचे सायलेन्सर बसवून देतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध यापुढील काळात तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिला आहेे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंदोरी फटाका

सायलेन्सरमधे फेरफार केल्यानंतर त्यातून फटाक्यासारखा आवाज येतो. काही गॅरेजचालक सायलेन्सरमध्ये फेरफार करुन देतात. परप्रांतातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, गॅरेजचालक अशा सायलेन्सरला ‘इंदोरी फटका’ असे म्हणतात. यापूर्वी वाहतूक शाखेने शहरातील वेगवेगळ्या भागात कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध कारावई केली होती. अशा प्रकारचे सायलेन्सर विक्री करणारे दुकानदार आणि गॅरेजचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.