पुणे : राज्यभरातील दीड कोटींहून अधिक वाहनधारकांनी जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसवलेलीच नाही. राज्य सरकारने ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी तिसऱ्यांदा आणि अखेरची दिलेली मुदत संपण्यास अवघे दहा दिवस राहिले असताना, ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे ‘एचएसआरपी’ न लावलेल्या वाहनांसाठी परिवहन विभागाकडून १५ ऑगस्टनंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार किंवा कसे, या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

राज्यातील सुमारे दोन कोटी १० लाख जुन्या वाहनांपैकी एक ऑगस्टपर्यंत केवळ ३९.५ लाख वाहनांनाच (१८.८५ टक्के) उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवली गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्याबाबत परिवहन विभागाकडून डिसेंबर २०२४ मध्येच आदेश काढून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीच्या काळात नियुक्त केलेल्या तिन्ही कंपन्यांकडे कुशल मनुष्यबळाची कमतरता, अपुरी केंद्रे आणि तांत्रिक चुकांमुळे मुदतवाढ देण्यात आली. परंतु, वाहनचालकांचा प्रतिसाद नसल्याने पुन्हा दोनदा मुदतवाढ देण्यात आली.

‘परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रारी करून मुदतवाढ देण्याची मागणी केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार परिवहन विभागाने ही अखेरची मुदतवाढ असेल, असे जाहीर करून १५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली. तरी, अद्याप ८० टक्के वाहनधारक प्रतीक्षेत आहेत. यामध्ये ५८ लाख वाहनधारकांनी वाहनाला पाटी बसविण्यासाठी नोंदणी करून काळ-वेळ निश्चित केली आहे,’ अशी माहिती सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली.

कामत म्हणाले, ‘राज्यातील जुन्या वाहनांपैकी सुमारे ५० लाख वाहने अशी आहेत, ज्यांचा अपघात, विक्री, बाहेर राज्यात स्थलांतर असे प्रकार घडलेले असण्याची शक्यता असून, काही वाहने मोडीतही काढण्यात आली असतील. मात्र, १५ ऑगस्टनंतर अशी वाहने रस्त्यावर आढळून आल्यास संबंधित वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पूर्वीच केल्या आहेत. त्याचबरोबर ज्या वाहनधारकांचे आरटीओमध्ये वाहनासंबंधी विक्री-खरेदी, हस्तांतरण, पत्ताबदल, बँक कर्ज उतरवणे, वाहन तपासणी प्रमाणपत्र, नूतनीकरण असे कसलेही काम आहे, त्यापूर्वी वाहनाला ही पाटी बसवली आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. एचएसआरपी पाटी नसल्यास कामे करण्यात येऊ नयेत, असाही आदेश देण्यात आला आहे.’

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्याबाबत नागरिकांकडून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. जे वाहनधारक ही पाटी मुदतीत बसवून घेणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. मुदतवाढीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. परिवहनमंत्र्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. – विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

‘एचएसआरपी’ची सद्य:स्थिती

अंमलबजावणीस सुरुवात : डिसेंबर २०२४ पासून ३१ मार्चपर्यंत

  • पहिली मुदतवाढ : ३० एप्रिलपर्यंत
  • दुसरी मुदतवाढ : ३० जूनपर्यंत
  • तिसरी मुदतवाढ : १५ ऑगस्टपर्यंत
  • एकूण वाहनधारक : २.१० कोटी
  • नवी पाटी बसविलेले वाहनधारक : ३९.५ लाख