नीलेश देशमुख, धर्मेंद्र गिऱ्हेपुंजे, भारती गावडे राज्यात प्रथम
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१चा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात अमरावती जिल्ह्यातील नीलेश देशमुख यांनी राज्यातून, गोंदिया जिल्ह्यातील धर्मेंद्र गिऱ्हेपुंजे यांनी मागास वर्गवारीतून, पुणे जिल्ह्यातील भारती गावडे यांनी महिला वर्गवारीतून राज्यात पहिला क्रमांक मिळवला.
एमपीएससीतर्फे १० ते १३ एप्रिल या कालावधीत महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१च्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तूत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे पात्रतागुण एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास त्यांनी गुणपत्रके त्यांच्या ऑनलाइन खात्यात पाठवल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत एमपीएससीकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याची माहिती एमपीएससीने दिली.
