पुणे : राज्यात पावसाने आठवडाभरापासून ओढ दिल्याने तापमानात वाढ होऊन पुन्हा उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबल्या आहेत. मंगळवार (१८ जून) अखेर राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ५.६९ टक्के पेरण्या झाल्या असून, पावसाने अल्पविश्रांती घेतल्याने शेतकरी पेरण्यांबाबत संभ्रमात पडले आहेत.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांची सरासरी पाहता, १८ जूनअखेर राज्यात सरासरी १,४२,०२,३१८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. यंदा मंगळवार (१८ जून) अखेर राज्यात जेमतेम ५.६९ टक्के म्हणजे ८,०८,७९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हेही वाचा…पुणे : अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांची पसंती कोणत्या शाखेला? तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर…

विभागनिहाय पेरणीचा विचार करता, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत सर्वांधिक सरासरीच्या तुलनेत ११.५५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्या खालोखाल नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये सरासरीच्या तुलनेत ११.४२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडलेल्या कोकण विभागात जेमतेम १.६६ टक्के, पावसाने ओढ दिलेल्या नागपूर विभागात ०.०८ टक्के, अमरावती विभागात ३.४९ टक्के, लातूर विभागात ५.१९ टक्के, कोल्हापूर विभागात ६.३२ टक्के आणि पुणे विभागात २.२० टक्के पेरण्या झाल्या आहेत.

कापसाची सर्वाधिक पेरणी

पीकनिहाय विचार करता, सरासरीच्या तुलनेत भात, बाजरी, रागी, तूर, उडीद आणि भुईमूगाची दोन टक्के, ज्वारी, अन्य तृणधान्यांची एक टक्का पेरणी झाली आहे. मक्याची सात टक्के, सोयाबीन आणि अन्य तेलबियांची पेरणी सरासरीच्या चार टक्केच झाली आहे. कापूस पिकाची सर्वांधिक ११ टक्के पेरणी. कापसाचे १८ जूनअखेर सरासरी क्षेत्र ४२,०१,१२८ हेक्टर असून, यंदा आजअखेर ४,७८,९५९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

हेही वाचा…रेल्वेत प्रवाशाला हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा… मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील घटना

विभागनिहाय पाऊस, पेरणी स्थिती

कोकण – सरासरीपेक्षा कमी पाऊस, भाताचे तरवे जगविण्यासाठी धडपड.
मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा – सरासरीपेक्षा जास्त पाऊस. पण, मागील आठ दिवसांपासून पावसाचा खंड. कापूस, सोयाबीन लागवड रखडली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भ – सरसरीपेक्षा कमी पाऊस. जमिनीच्या मशागती, बियाणांची तजवीज करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत.