पुणे : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीसाठी १ लाख ३८ हजार १०१ विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली आहे. तसेच दुसऱ्या फेरीसाठी ५ लाख ५३ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग दोन भरला असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली. आता दुसऱ्या फेरीची निवडयादी १७ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागातर्फे अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीच्या नोंदणीसाठी रविवारी संपली. अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ४६९ कनिष्ठ महाविद्यालयातील २१ लाख ३२ ९६० जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत एकूण ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

त्यात राखीव कोट्यातून प्रवेश घेतलेल्या ७५ हजार ८०९, तसेच केंद्रीभूत पहिल्या फेरीद्वारे ४ लाख ३२ हजार २८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर एकूण १६ लाख २४ हजार ८६४ जागा अद्याप रिक्त असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आता दुसऱ्या फेरीची निवडदायी १७ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यात प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलै या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.

दरम्यान, पहिल्या फेरीवेळी शिक्षण विभागाला अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागते होते. त्यानंतर पहिल्या फेरीसाठी जाहीर केलेल्या निवडयादीत एकूण ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. त्यापैकी ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विज्ञान शाखेसाठी अर्ज केलेल्या ६ लाख ९ हजार ७१८ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ४२ हजार ८०१, वाणिज्य शाखेसाठी अर्ज केलेल्या २ लाख २३ हजार ९३१ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३९ हजार ६०२, तर कला शाखेसाठी अर्ज केलेल्या २ लाख ३१ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३९ हजार ७९१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. प्रत्यक्षात प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सुमारे ६८ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केला. त्यामुळे आता दुसऱ्या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर होतो, हे पहावे लागणार आहे.