पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वीजेवर चालणाऱ्या वाहन वापराचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित वाहनांच्या फेरीचे आयोजन करण्यात येत आहे. पर्यायी इंधन वाहनवापरात महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केला.
परब म्हणाले, “पर्यावरण बदलांमध्ये वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हे एक मोठे करण आहे. यामध्ये बदल करायचा असेल तर पर्यायी इंधनाकडे वळावे लागेल. या फेरीमध्ये विजेवर चालणारी ३५० वाहने होती. यावरून आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे लक्षात येते. या धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अशा प्रत्येक उपक्रमाला राज्यशासन प्रोत्साहन देईल.”
नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वीजेवरील वाहनाच्या बॅटरीमध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे वीजेवरील वाहने वापरण्याचे सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. पर्यावरण बदलाचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम तसेच वीजेवरील वाहन धोरणाचा प्रसार-प्रचार करुन समाजात जनजागृती होण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रशांत गिरबाने म्हणाले.
पर्यायी इंधन परिषदेच्या वाहन फेरीचा प्रारंभ नवीन कृषी मैदान येथे ॲड. अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भारत ससाणे, एमआयडीसीचे महाव्यवस्थापक अभिजित घोरपडे, प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, अविनाश हदगल, एमसीसीआयएचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते.