पुणे : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) गेल्या आठ वर्षांत नोंदविण्यात आलेल्या राज्यभरातील एकूण गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. संपूर्ण देशात प्रकल्पांच्या नोंदणीत महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे, तर राज्यात पुण्यातील प्रकल्पांची नोंदणी सर्वाधिक आहे.

‘महारेरा’ची स्थापना २०१७ मध्ये करण्यात आली. ‘महारेरा’ला नुकतीच आठ वर्षे पूर्ण झाली असून, नववे वर्ष सुरू आहे. या कालावधीत ‘महारेरा’कडे एकूण ५० हजार १६२ गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. या बाबतीत देशात महाराष्ट्र पहिल्या स्थानी असून, तमिळनाडू दुसऱ्या आणि गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण गृहनिर्माण प्रकल्पांपैकी ३५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रकल्प महाराष्ट्रात आहेत.

राज्यातील एकूण प्रकल्पांत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार ७८८ गृहनिर्माण प्रकल्प आहेत. पुणे विभागात एकूण १५ हजार ९३२ प्रकल्प असून, त्यात पुण्याशिवाय सातारा (१ हजार ८८), कोल्हापूर (७८५), सांगली (७५७) आणि सोलापूर (५१४) येथील प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यात विभागनिहाय विचार करता, मुंबई-कोकण विभागात २३ हजार ७७०, उत्तर महाराष्ट्र विभागात ४ हजार ६२१, नागपूर विभागात २ हजार ७६४, छत्रपती संभाजीनगर विभागात १ हजार ८८६ आणि अमरावती विभागात ९५७ गृहनिर्माण प्रकल्प आहेत.

‘महारेराकडे नोंदविण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या ५० हजारांवर पोहोचली आहे. उद्योगस्नेही, प्रगतिपथावर असलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने ही नक्कीच चांगली बाब आहे. काही वर्षांपूर्वी बहुतांश मुंबई महानगर किंवा पुणे परिसरापुरते मर्यादित असलेले स्थावर संपदा क्षेत्र आता राज्यात सर्वत्र विस्तारत आहे. राज्यभरातील घरांची सततची वाढती मागणी, हे राज्याच्या सर्वांगीण विकासाचे द्योतक आहे. घरखरेदीदारांना कायदेशीरदृष्ट्या सक्षम करीत असतानाच तक्रारी उद्भवू नयेत, यासाठीही ‘महारेरा’ काळजी घेत आहे.’ असे ‘महारेरा’चे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी नमूद केले.

सर्वाधिक प्रकल्प असलेले जिल्हे

पुणे : १२,७८८

ठाणे : ६,७४६

मुंबई उपनगर : ५,९०७

रायगड : ५,३६०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक : ३,८५४