पुणे : राज्यातील पुणे आणि नागपूर मेट्रोची सायबर सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन (महामेट्रो) आणि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (आयआयटी) कानपूर यांच्यात गुरुवारी करार करण्यात आला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आयआयटी कानपूरची उपकंपनी असलेल्या ‘सीथ्रीआय हब’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तनिमा हाजरा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी महामेट्रोचे संचालक विनोदकुमार अग्रवाल, अनिल कोकाटे, हरेंद्र पांडे, सीथ्रीआयहबचे डॉ. आनंद हांडा आणि डॉ. रस द्विवेदी उपस्थित होते.

हा करार नागपूर येथील झीरो माइल ओसीसी, हिंगणा डेपो, सीताबर्डी, एअरपोर्ट साउथ, खापरी, मेट्रो भवन येथील प्रणालींचे आणि पुण्यातील ओसीसी, रेंज हिल्स डेपो, सिव्हिल कोर्ट, पीसीएमसी, स्वारगेट, मेट्रो भवन येथील प्रणालींचे मूल्यांकन करणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या सायबर सुरक्षा जागतिक दर्जाच्या मानकांशी सुसंगत होणार आहे.

हर्डीकर म्हणाले, ‘मेट्रो संचलनात सायबर प्रणालीला धोका होऊ नये, यासाठी सशक्त प्रणाली असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने महामेट्रोने सुरक्षात्मक नियोजन केले आहे. त्यानुसार पुणे आणि नागपूर महामेट्रोने ‘आयआयटी’शी करार केला आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागृती निर्माण केली जाणार आहे. माहितीचे अचूक संकलन, नियोजन, नेटवर्क मॅनेजमेंट, फायरवॉल्स, एअरगॅप्स आणि स्वतंत्र नेटवर्क यांसारख्या उपाययोजनांमुळे मेट्रोच्या सायबर सुरक्षेला चालना मिळेल,’

 मेट्रोचे अनेक विभाग असून या सर्व शाखांचा सर्व सामान्य नागरिकांशी संपर्क असतो. या मुळे सायबर हल्ला सारख्या धोक्यापासून मेट्रो वंचित राहू शकत नाही आणि या पासून बचाव करण्याकरिता एक सशक्त प्रणाली असणे अतिशय आवश्यक होते, म्हणून  पुणे आणि नागपूर मेट्रो सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखी मजबूत झाली आहे, असा विश्वास हर्डीकर यांनी व्यक्त केला.

कराराची वैशिष्ट्ये

– सायबर सुरक्षा त्रुटी मूल्यांकन

– धोरण व प्रशासन संरचना

– जोखीम कमी करण्याचा पथदर्शी आराखडा

– सतत सुरक्षा देखरेख