Maha Metro :पुणे : यंदाचा गणेशोत्सव महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनला (महामेट्रो) भरभराटीचा ठरला आहे. ‘महामेट्रो’ने गणेशोत्सव काळात प्रवाशांची आणि आर्थिक उत्पन्नाची विक्रमी नोंद केली.गणेशोत्सवात सर्वाधिक ३७ लाख १६ हजार ५१२ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवात महामेट्रोचे उत्पन्न दोन कोटी ६१ लाख रुपयांनी वाढले. गणेशोत्सव काळात महामेट्रोला ५.६७ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले असून, गेल्या वर्षी ३.०५ कोटी रुपये उत्पन्न मिळवले होते.
विशेषतः अनंत चतुर्दशीच्या दिवशी (६ सप्टेंबर) प्रवासी संख्या आणि उत्पन्नाचा उच्चांक नोंदला गेला. या एका दिवसात सर्वार्धिक ५.९० लाख प्रवासी आणि ६८.९५ लाख उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ लाख रुपयांनी अधिक उत्पन्न प्राप्त केले आहे.
गणेशोत्सवानिमित्त मेट्रोने यंदा रात्री उशिरापर्यंत मेट्रोसेवा सुरू ठेवली होती. अनंत चतुर्दशी आणि दुसऱ्या दिवसासाठी सलग ४१ तास मेट्रो सुरू होती. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा पाहण्यासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांची सोय झाली. पुणे मेट्रोच्या ‘पर्पल लाइन’ आणि ‘एक्वा लाइन’ या दोन्ही मार्गांवर २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या सहा दिवसाच्या कालावधीत एकूण २३ लाख ९६५ प्रवाशांनी प्रवास केला. सहा दिवसांत ३ कोटी ५७ लाख २१ हजार ७५४ रुपयांची कमाई केली आहे.
‘इतर दिवशी अशीच सेवा द्यावी’
‘महामेट्रो’ने ऑगस्ट महिन्यापासून मेट्रोच्या फेऱ्या सहा मिनिटांवर आणल्याने प्रवाशांना फायदा होत आहे. रात्री उशिरापर्यंत मेट्रो सुरू ठेवल्याने प्रवाशांना नियोजित ठिकाणी जाण्यासाठीची सुलभ सेवा उपलब्ध होत असून, प्रवाशांचा प्रतिसादही वाढत आहे. महामेट्रोने केवळ गणेशोत्सव काळातच नाही, तर इतर दिवशीही अशीच सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मेट्रो प्रवासी अमर देशपांडे यांनी केली.
सरासरी तुलनेतही वाढ
दरवर्षी गणेशोत्सव काळात महामेट्रोला सर्वाधिक उत्पन्न मिळते. गेल्या वर्षी मेट्रोने ३.०५ कोटींचे उत्पन्न मिळवले होते. सरासरी ६५ हजार ८२२ प्रवाशांनी प्रवास केला होता, तर यंदा सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांतच मेट्रोने ३.५७ कोटी रुपये आर्थिक उत्पन्न मिळवले. दररोज सरासरी तीन लाख ८३ हजार ४९४ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
दोन वर्षांतील गणेशोत्सवातील मेट्रोसेवा
वर्ष – प्रवासी – उत्पन्न (रु.)
२०२४ – २०,४४,३४२ – ३,०५,८१,०५९
२०२५ – ३७,१६,५१२ – ५,६७,२७,७४१