पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ मिळणार आहे. त्याबाबत शासन मान्यता देण्यात आली असून, राज्यभरातील ५० हजारांवर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे.
आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दहा वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळची बाब म्हणून सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना ईएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे. कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार,अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, सन २०१६-१७ पूर्वी सेवेत आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्याच्या बाबत शासन सकारात्मक असून, पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची गेले अनेक वर्षापासून भरीव मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे.
सद्य:स्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जूनच्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. पंधरा टक्क्यांपैकी पाच टक्के मानधन वाढ सरसकट लागू होणार असून, उर्वरित मानधन वाढ ही कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यांकनानुसार करण्यात येणार आहे. मानधन वाढीचे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या पूर्वी सेवा समाप्त झालेल्या राजीनामा दिलेल्या किंवा बडतर्फ झालेल्या तसेच कार्यक्रम अंमलबजावणी आराखडामध्ये पद मंजूर नसलेल्या ऑन कॉल बेसिस, डेली वेजेस, बाह्य स्तोत्र यंत्रणेद्वारे नियुक्त कर्मचाऱ्यांना मानधन वाढ लागू नाही.