पुणे :अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शन, तर श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या पाच ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) विशेष सहलीच्या गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. याबरोबरच तीर्थक्षेत्र गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि रायगड किल्ला या ठिकाणीही विशेष जादा बस सोडण्यात येणार आहेत.
अष्टविनायक दर्शनासाठी ऑनलाइन माध्यमातून आगाऊ आरक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, तर ज्योतिर्लिंग आणि इतर तीर्थस्थळांवर जाण्यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार ‘एसटी’ सोडण्यात येणार आहे. आतापर्यंत अष्टविनायक आणि ज्योतिर्लिंग दर्शनासाठी प्रत्येकी एक अशा दोन गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती ‘एसटी’ महामंडळाच्या पुणे विभागाकडून देण्यात आली.
श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात असून शिवभक्तांसाठी पर्वणीचा असतो. परिसरातील शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी होत असून विशेषतः भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ येथे शिवभक्तांची रीघ लागते. गावागावांतून यात्रा, सहली, तीर्थदर्शनासाठी भाविकांची मागणी वाढते. या मार्गांवर जाणाऱ्या नियमित ‘एसटी’ भरगच्च असतात. त्यामुळे अनेक भाविकांचा हिरमोड होतो. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने स्वारगेट आगारातून मागणीनुसार पाच ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी आणि अष्टविनायक दर्शनासाठी विशेष जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
एखाद्या गावातून ३५ ते ४० भाविकांच्या समूहाने या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी ‘एसटी’ची मागणी केल्यास तातडीने नियोजन करण्यात येणार आहे. स्वारगेट आणि चिंचवड स्थानकांमध्ये अतिरिक्त गाड्या ठेवण्यात आल्या आहेत.
ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी तीन दिवस
महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी स्वारगेट आगारातून तीन दिवसांच्या सहलीचे नियोजन करून निम-आराम एसटी असेल. प्रवासाची सुरुवात पुण्यातील भीमाशंकर त्यानंतर नाशिक – त्र्यंबकेश्वर, छत्रपती संभाजीनगर (घृष्णेश्वर), बीडमधील परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ आणि पुन्हा पुणे अशी एसटी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या ठिकाणी दोन दिवस
स्वारगेट व चिंचवड स्थानकातून तुळजापूर (तुळजाभवानी मंदिर), अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि गाणगापूर (श्री दत्त देवस्थान) या ठिकाणी दोन दिवसांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले असून, प्रवाशांनी समूहाने आरक्षण करणे अनिवार्य असणार आहे.
श्रावणमास सुरू होणार असल्याने ‘एसटी’ महामंडळाच्या स्थानकातून विशेष जादा सहलीच्या गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वेळापत्रक करण्यात आले असून, प्रवाशांनी समूहाने आरक्षण करावे.- अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे