पुणे : ‘जे लिहिले लल्लाटी.. तेही बदले तल्लाठी..’ अशी म्हण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रचलित आहे. कदाचित त्यामुळेच तलाठी होण्यासाठी अनेक उच्चशिक्षित तरुणांसह लाखो जण खटपट करतात. आताही राज्य शासनाच्या महसूल विभागाकडे ४ हजार ६४४ तलाठी पदांसाठी तब्बल साडेअकरा लाख अर्ज आले आहेत. या विक्रमी संख्येमुळे विविध केंद्रांवर तीन पाळय़ांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने ४६४४ तलाठी पदांसाठी अर्ज मागविले होते. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तीन आठवडय़ांची मुदत देण्यात आली होती. खुल्या गटात एक हजार तर इतर गटांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले होते. १७ जुलै ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र, उमेदवारांच्या आग्रहास्तव याला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री अर्ज भरण्याची मुदत संपली तेव्हा ११ लाख ५० हजार २६५ अर्ज प्राप्त झाले होते. दाखल अर्जापैकी सुमारे दहा लाख उमेदवारांनी शुल्क भरले आहे. शुल्क भरण्यासाठी गुरुवापर्यंत (२० जुलै) मुदत आहे. जे उमेदवार परीक्षा शुल्क भरतील, तेच परीक्षेस पात्र असल्याचे भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची वेळ आणि तारीख जाहीर केली जाईल. उमेदवारांच्या जास्त संख्येमुळे दररोज ५० ते ६० हजार उमेदवारांची राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून ही प्रक्रिया २० दिवस चालण्याची शक्यता असल्याचे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी सांगितले. परीक्षेच्या निकालानंतर निवडसूची तयार होऊन पदांवर कर्मचारी रुजू होण्यास नवे वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाखो उच्चशिक्षितही स्पर्धेत  यावेळच्या तलाठी भरतीमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक शास्त्र, विज्ञान, कला, वाणिज्य आदी शाखांमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांनीही मोठय़ा प्रमाणात अर्ज केल्याची माहिती जमाबंदी आयुक्तालयाकडून देण्यात आली.