पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबर रोजी राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित करण्यात आली आहे. सेवेत कार्यरत असणारे सुमारे दीड ते दोन लाख शिक्षकही परीक्षा देणार आहेत. त्यामुळे परीक्षार्थी शिक्षक, या परीक्षेसाठी कामकाज करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी २२ आणि २३ नोव्हेंबर नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीचे प्रशिक्षण न घेता अन्य दिवशी आयोजित करण्याबाबत राज्य परीक्षा परिषदेने पत्र दिले आहे.

जिल्हाधिकारी जिल्हास्तरावरील परीक्षा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष असतात. या अनुषंगाने राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्या निवडणूक प्रशिक्षणासंदर्भात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. टीईटी परीक्षेसाठी राज्यभरातील ४ लाख ७५ हजार ६६८ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यांपैकी सुमारे दीड ते दोन लाख उमेदवार सध्या शिक्षक म्हणून सेवेत कार्यरत आहेत.

तसेच परीक्षेच्या आयोजनामध्ये शिक्षण विभागाचे किमान २५ हजार अधिकारी, कर्मचारी २२ आणि २३ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी कार्यरत राहणार आहेत. राज्यभरात नगर परिषद, नगरपंचायत निवडणूक २ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी २ लाख शिक्षक परीक्षार्थ्यांसह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग असल्याने त्यांच्यासाठीचे निवडणूक प्रशिक्षण जिल्ह्यात कोठेही घेणे योग्य होणार नाही.

निवडणूक प्रशिक्षण २३ नोव्हेंबर रोजीच घेणे अनिवार्य असल्यास टीईटी परीक्षेतील परीक्षार्थी आणि परीक्षेसंबंधित काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी २४ आणि २५ नोव्हेंबरला निवडणुकीचे अतिरिक्त प्रशिक्षण घेता येऊ शकेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मागील वर्षीही सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यानच १० नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. त्या वेळीही टीईटी परीक्षेच्या अनुषंगाने १० नोव्हेंबर रोजीचे निवडणूक प्रशिक्षण टीईटी परीक्षेसंबंधित कामकाज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पुढील दिवसांमध्ये स्वतंत्रपणे घेण्यात आले होते. ही बाब लक्षात घेऊन, तसेच टीईटी परीक्षा संवेदनशील असल्याने नगर परिषद, नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रशिक्षण २२ आणि २३ नोव्हेंबरऐवजी इतर दिवशी आयोजित करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कार्यरत शिक्षकांना, पदोन्नतीसाठी टीईटी पात्र होणे अनिवार्य असल्याचा निर्णय दिला आहे. त्यानंतर देशभरातील शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदतर्फे होत असलेल्या टीईटीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढली आहे.