पुणे : अचूक देयकांसाठी राज्यातील वीजग्राहकांना टाइम ऑफ डे (टीओडी) मीटर मोफत देण्यात येत आहेत. मात्र, आतापर्यंत पुणे विभागातील केवळ ११.९३ टक्के ग्राहकांनाच टीओडी मीटर देण्यात आल्याचे ‘महावितरण’च्याच आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अफवांमुळे नवे ‘टीओडी’ मीटर बसवण्याची प्रक्रिया मंदावली होती, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
वीजवापराचे अचूक वाचन व्हावे, त्यात होणाऱ्या मानवी चुका टाळण्यासाठी राज्यातील सर्व वीजग्राहकांना महावितरणकडून नवे ‘टीओडी’ मीटर देण्यात येत आहेत. नवे मीटर महावितरणकडून मोफत देण्यात येत असून, त्यासाठी ग्राहकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. महावितरणच्या पुणे विभागात सुमारे ३७ लाख वीज ग्राहक आहेत. त्यातील केवळ ११.९ टक्के म्हणजे ४ लाख ४० हजार वीज ग्राहकांना ‘टीओडी’ मीटर दिल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
नवे मीटर हे ‘पोस्टपेड’
सुरुवातीच्या काळात ‘टीओडी’ मीटरबाबत अनेक अफवा पसरल्याने ग्राहकांकडून मीटर बसविण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळेच विभागात नवे मीटर बसवण्याची प्रक्रिया मंदावली. मीटर प्रीपेड असून, रात्री-अपरात्री ‘रीचार्ज’ संपल्यावर काय करायचे, अशा अफवा समाजमाध्यमांवर पसरल्या. मात्र, त्यात तथ्य नसून, नवे मीटर हे ‘पोस्टपेड’च आहेत. ग्राहकांना महिनाभराच्या वापरानंतर पूर्वीप्रमाणेच घरपोच किंवा ऑनलाइन पद्धतीने देयके मिळणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
‘टीओडी’ मीटर का गरजेचे?
घरगुती वीजग्राहकांसाठी स्वस्त वीज दरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) प्रणाली, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी नेटमीटरिंग, स्वयंचलित व अचूक मीटर रीडिंग अशा मुख्य सुविधा या ‘टीओडी’ मीटरमध्ये देण्यात आल्या आहेत. तसेच, ग्राहकांना त्यांचा वीजवापर प्रत्येक मिनिटाला कळण्यासाठी ‘महाविद्युत’ ॲपवर सोय करून देण्यात आली आहे. अचूक आणि सवलतीच्या वीजदरांसाठी ‘टीओडी’ मीटर आवश्यक असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
काही ठिकाणी ‘टीओडी’ मीटरचे फायदे समजून न घेता, ते बसविण्यापूर्वीच विरोध केला जात आहे. या मीटरमुळे वीजदेयकात वाढ होत नाही, तर ते अचूक होण्यास मदत होते. मीटरवर शंका असलेल्या ग्राहकांना मीटर चाचणी कक्षात प्रत्यक्ष पडताळणी करण्याची सोय आहे. त्यामुळे अफवांना बळी पडू नये. – सुनील काकडे, मुख्य अभियंता, पुणे विभाग, महावितरण.