पिंपरी : शिवसेनेचे (शिंदे) पुणे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता आहे. अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता आहे. भाजपच्या विरोधात आपली भूमिका नसल्याचे धंगेकर यांनी स्पष्ट केले आहे. जे प्रकरण सुरू आहे, त्यावर लवकरच पडदा पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीत दंगा करायचा नाही, असे मी धंगेकर यांना सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

आळंदीतील भक्त निवास आणि महाद्वार ते पुंडलिक मंदिर घाट सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या रविवारी हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री भरत गोगावले, शिवसेनेचे (शिंदे) पुणे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यावेळी उपस्थित होते.

पुण्याचे भाजपचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंगच्या जागेवरून धंगेकर यांच्याकडून विविध आरोप केले जात आहेत. महायुतीत एकत्र असलेल्या मोहोळ आणि धंगेकर दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेनेचे (शिंदे) पुणे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता आहे.

अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता आहे. महायुतीत दंगा करायचा नाही, असे मी त्यांना सांगितले आहे. तो विषय आता संपला आहे. धंगेकर यांना ज्या गोष्टीची माहिती मिळाली, त्यावर ते बोलले आहेत. शेवटी महायुती आहे. विरोधकांच्या हातात कोणतेही कोलीत द्यायचे नाही, असे धंगेकर यांना सांगितले आहे. हा विषय संपेल.

आळंदीत आल्यावर मनाला समाधान मिळते. मुख्यमंत्री असताना अनेक वेळा आलो आहे. आताही सातत्याने येत आहे. आज भक्त निवासाचे भूमिपूजन झाले. चांगल्या दर्जाचे भक्त, घाट निवास होईल. वारकऱ्यांची मोठी सोय होईल. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यावर काम सुरू आहे. राज्य शासनाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक सादरीकरण झाले आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणे हे आमचे प्रमुख काम आहे. प्रदूषणमुक्त इंद्रायणी नदी करण्यासाठी जे काही करावे लागेल ते केले जाईल, असेही शिंदे म्हणाले.