पुणे : चाेरलेल्या मोटारीतून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने अटक केली. त्याच्याकडून मोटारीसह दागिने असा २१ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने पुन्हा घरफोडीचे गुन्हे करण्यास सुरुवात केल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

बिरजू राजपूतसिंग दुधानी (वय ४०, रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध येरवडा, चिखली, भोसरी एमआयडीसी, संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेचे पथक रविवारी (१२ ऑक्टोबर) खराडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दुधानी मोटारीतून निघाला असून, त्याने घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती पोलीस कर्मचारी नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. पोलसिांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. दुधानी वापरत असलेल्या मोटारीला वाहन क्रमांकाची पाटी नव्हती. पोलिसांनी त्याच्याकडून दागिने, मोटार असा २१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, नीलेश साळवे, नेहा तापकीर, ऋषीकेश व्यवहारे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी ही कामगिरी केली.

पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरणारे अटकेत

पीएमपी बस प्रवासी महिलांचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख २५ हजारांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.  सुदर्शन ऊर्फ दादूऱ्या रामू जाधव (वय २१, रा. भेकराईनगर हडपसर), बालाजी राजू उमाप (वय २०, गुलटेकडी), यश हरीश खर्डेकर (वय २४), प्रशांत अनिल पवार (वय ३४, रा. मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्याा चोरट्यांची नावे आहेत. विश्रांतवाडी भागात पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील उपनिरीक्षक महेश भोसले आणि कर्मचाारी चोरट्यांचा माग काढत होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुदर्शन जाधव याला ताब्यात घतेले. त्याच्याकडून तीन लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बालाजी उमाप, यश खर्डेकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख २५ हजारांची सोनसाखळी जप्त केली. पीेमपी बस प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कापून पसार झालेला चोरटा प्रशांत पवार याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लाख रुपयांची सोन्याची बांगडी जप्त करण्यात आली. पवार याने तीन गुन्हे केल्याची कबुली दिली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कांचन जाधव, दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक महेश भोसले, बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, संपत भोसले, संजय बादरे, वामन सावंत, धवल लोणकर, विशाल गाडे, अक्षय चपटे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव, हिना साबळे यांनी ही कामगिरी केली.