पुणे : बस प्रवासात ओळख झाल्यानंतर पुण्यात पुस्तके खरेदीसाठी आलेल्या तरुणीला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करुन तिच्याकडून १६ लाख रुपये उकळणाऱ्या एकास अटक करण्यात आली.
हेही वाचा >>> पुणे : युराेपमधील माल्टा देशात शेफची नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची फसवणूक
या प्रकरणी फईम नईम सय्यद (वय ३३, रा. नेहरुनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका २७ वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडित तरुणी मूळची परगावची आहे. ती पुण्यात पुस्तके खरेदीसाठी बसने येत होती. बस प्रवासात तिची आरोपी फईम याच्याशी ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक दिले. मोबाइलवरुन दोघांमधील संपर्क वाढला. गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी ती पुण्यात आली होती. तिने पुस्तके खरेदी केली. त्यानंतर तिने फईमशी संपर्क साधला. तेव्हा फईमने तिला जेवायला जाऊ असे सांगून जंगली महाराज रस्त्यावरील एका उपहारगृहात नेले. तेथे तिला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. त्यानंतर तरुणीला एका लाॅजमध्ये नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. तरुणीचे छायाचित्रे काढली तसेच ध्वनिचित्रफीत तयार केली.
हेही वाचा >>> पुणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कराटे शिकवणाऱ्या शिक्षकास दहा वर्षांचा तुरुंगवास
तरुणी मूळगावी गेल्यानंतर फईमने तरुणीशी संपर्क साधला. समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत तसेच छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. तरुणीला धमकावून त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. घाबरलेल्या तरुणीने एका बँकेकडून कर्ज काढून त्याला १६ लाख ८६ हजार रुपये दिले. त्यानंतर तो तरुणीला धमकावत होता. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. फईमला अटक करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करत आहेत.
