युरोपमधील माल्टा देशात शेफ म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला तेथे पाठविण्यात आले. प्रत्यक्षात बेकरीत सफाईचे काम मिळाले. तरुणाने या कामास नकार दिल्यानंतर त्याला अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली. अखेर तक्रारदार तरुणाने बहिणीच्या मदतीने भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांच्या मदतीने तो पुन्हा भारतात आला. त्यानंतर त्याने पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा- चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची घेतली भेट
कर्वे रस्ता परिसरातील खिलारेवाडीत राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अनिकेत विश्वास बोथरा (वय २९, रा. दीपबंगला चौक, शिवाजीनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिकेत बोथरा याची फर्ग्युसन रस्त्यावर ट्रॅव्हल एजन्सी आहे. तक्रारदार तरुणाचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने युरोपातील माल्टा देशात पिझ्झा शेफची नोकरीची संधी अशी जाहिरात वाचली होती. जाहिरात वाचून तो अनिकेतच्या कार्यालयात गेला होता. माल्टा देशात दरमहा ११०० युरो पगाराची नोकरी मिळेल, असे बोथराने त्याला सांगितले होते. सुरुवातीला त्याला परदेशात जाण्यासाठी साडेसहा लाख रुपये खर्च सांगण्यात आला होता. त्यानंतर त्याच्याकडून साडेनऊ लाख रुपये घेण्यात आले होते.
हेही वाचा- बारावी गणिताची प्रश्नपत्रिका फुटली; सिंदखेडराजा येथील प्रकार, अर्ध्या तासातच समाजमाध्यमांवर प्रसारित
तक्रारदार तरुणाला जानेवारी २०२३ मध्ये माल्टात नोकरीसाठी पाठविण्यात आले. तेथे गेल्यानंतर तरुणाला एका बेकरीत साफसफाईचे काम देण्यात आले. त्याला ९०० युरो पगार देण्यात आला. त्याने पगारास नकार दिला. तेव्हा त्याला अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात आली. घाबरलेल्या तरुणाने बहिणीला या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर बहिणीने भारतीय दूतावासात संपर्क साधला. दूतावासातील अधिकाऱ्यांच्या मदतीने तरुण नुकताच पुण्यात परतला. त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.