मुख्यमंत्री कार्यालयातून अधिकारी बोलत असल्याचे सांगत शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थाचालकांना दूरध्वनी करून महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या बहाण्याने पालकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. राहुल राजेंद्र पलांडे (वय ३१, रा. दर्शननगरी, केशवनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातील लिपिक नितीन उत्तम पानसरे (वय ४६, रा. खारघर, नवी मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी राहुल हा मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी असल्याचा बहाणा करून नागरिकांचा विश्वास संपादन करत शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगत पैसे घेत होता. मोबाईलच्या ट्रू कॉलरवर आणि व्हॉट्सॲप डीपीवर मुख्यमंत्री कार्यालयाचे बनावट बोधचिन्ह ठेवले होते. बनावट ई-मेल आयडी ठेवला होता. त्याने मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत शैक्षणिक संस्थांना दूरध्वनी केले. त्यानुसार सिम्बायोसिस, डी. वाय. पाटील महाविद्यालय येथे चार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात एका खासगी कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना संस्थांचे शिष्टमंडळ भेटले. मुख्यमंत्री कार्यालयातील शिफारशीनुसार चार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिल्याचे सांगितले. शिष्टमंडळाने मोबाईलद्वारे झालेल्या संवादाची माहिती दिली. मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आरोपी राहुल याच्याबाबत, कार्यालयातून कोणाला शिफारस पत्र दिले का याची खातरजमा केली. त्यानंतर कोणीच असे शिफारस पत्र कोणाला दिले नसल्याचे उघड झाल्याने पलांडे याने बनावट पत्र तयार करून, लोकांकडून पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.