लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गुन्हेगार मित्राला जामीन मिळवून देण्यासाठी एकाने ठाण्यातील चोरट्याची मदत घेऊन शहरात साखळीचोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, ठाण्यातील चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याकडून साखळीचोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

सागर संदीप शर्मा (वय २०, रा. एसआरए वसाहत, लेकटाऊन, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा साथीदार प्रथमेश उर्फ पिल्या प्रकाश ठमके (वय २५, रा. पारसेवाडी, कोपरी, ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अलाा आहे. गेल्या आठवड्यात बिबवेवाडी भागात सकाळी फिरायला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी बिबवेवाडीतील लेकटाऊन सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचा माग काढण्यास सुरूवात केली. तेव्हा आरोपी एसआरए वसाहतीकडे दुचाकीवरुन गेल्याचे आढळून आले.

आणखी वाचा-अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या कारखान्याची जबाबदारी सांभाळणारा अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासात शर्माने साथीदाराच्या मदतीने साखळीचोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी मितेश चोरमले, अभिनय चौधरी, अवधूत जमदाडे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने शर्माचा शोध सुरू केला. बिबवेवाडी भागात तो दांडिया खेळण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. शर्माने गुन्हेगार मित्राला जामीन मिळवून देण्यासाठी महिलांचे दागिने हिसकावण्याचे गुन्हे केल्याची तपासात उघडकीस आले. ठाण्यातील चोरटा ठमके याची मदत घेऊन त्याने विश्रांतवाडी, भारती विद्यापीठ, कोंढवा, येरवडा भागात दागिने हिसकावण्याचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून एक लाख १५ हजार रुपयांच्या दोन सोनसाखळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, गिरीश दिघावकर, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे आदींनी ही कारवाई केली.